आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून महिला जागर केला जात आहे. विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या कार्याचे गोडवे गायले जात आहेत. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक नात्यातील स्त्रीचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आजच्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीचा उल्लेख करून मुलीच कशा चांगल्या असतात, याचं उदाहरण आज दिलं. ते राज्यस्तरीय ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ समारोप व कन्यारत्न सन्मान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेही उपस्थित होत्या.

महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्या शक्तीचा अविष्कार सातत्याने आपल्याला होत राहिला पाहिजे. यासाठी महिला दिनाचं औचित्य आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गोष्ट आपल्याला निक्षूण सांगितली की तेच देश विकसित होऊ शकले, ज्या देशांनी ओळखलं की आपल्या अर्थचक्राचे ५० टक्के भागीदारी महिलांकडे आहे. त्यामुळे या महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणणार नाही, या महिलांना मानवसंसाधन म्हणून विकसित करणार नाही, तोपर्यंत विकसित भारत होऊ शकणार नाही.”

काही जिल्ह्यांत मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत

“म्हणूनच, बेटी बचाओ, बेटी पढाओपासून याची सुरुवात होऊन आज लखपती दिदींपर्यंत पोहोचलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय चांगला उपक्रम आपण राबवला. आपल्या समाजात स्त्री भ्रूण नष्ट करायची प्रथा सुरू झाली होती. काही जिल्ह्यांत आजही लिंग विषमता आजही आहे. पण बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमामुळे हे जिल्हे सुधारत आहेत. काही जिल्ह्यांत, तालुक्यात मुलांना लग्नाकरता मुली मिळत नाहीत. पण महाराष्ट्रात बेटी बचाओ, बेटी पढाओ २०१५ सुरू झाल्यावर अशाप्रकराच्या जिल्ह्यांत प्रचंड सुधारणा झाली. लिंग गुणोत्तर सुधारलं”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुलींना आई-बापाची काळजी जास्त

ते पुढे म्हणाले, “मी स्वतः मुलीचा बाप असल्याने सांगू शकतो की मुलांपेक्षा मुली बऱ्या असतात. त्या आई बापाची काळजी जास्त घेतात. त्यामुळे आता ही मानसिकता निश्चितपणे आपल्या समाजात बदलत आहे.”

Story img Loader