हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. तसेच, राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधताना त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची देखील आठवण विधानसभेत बोलताना काढली. यावेळी फडणवीसांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप, शेतकऱ्यांच्या समस्या, ओबीसी आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर सरकारला सुनावलं.
संयुक्त महाराष्ट्र हीच आमचीही भूमिका, पण..
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आपलं समर्थन असल्याचं सांगितलं. “मुंबई, बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र हीच आमची पण भूमिका आहे. पण विदर्भ, मराठवाडा महाराष्ट्रात नाही का?”, असा सवाल त्यांनी केला. “वैधानिक विकास मंडळ काढून घेण्याचे पाप या सरकारने केले. ही कवच-कुंडले तुम्ही काढून घेतली. आता विदर्भ-मराठवाड्यावर अन्यायाची मालिका सुरू केली. वीज सवलत देखील बंद केली”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्याची स्थिती भयावह!
दरम्यान, यावेळी फडणवीसांनी राज्यातल्या अनेक समस्या उपस्थित करत राज्याची स्थिती भयावह असल्याचं म्हटलं. “राज्यातील स्थिती भयावह आहे. पण शासनाची त्यावर कुठलीही प्रतिक्रिया नाही. आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रचंड वेदना होत असतील”, असं फडणवीस म्हणाले.
कुसुमाग्रजांची कविता…
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी कुसुमाग्रजांची एक कविता देखील म्हणून दाखवली. “स्वातंत्र्यदेवीची विनवणी आज इतकी खरी ठरेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. कुसुमाग्रज सांगून गेले ते किती परखड आहे बघा…
सूर्यकुलाचा दिव्य वारसा
प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन
घुबडांचे व्रत करू नका
जनसेवेस्तव असे कचेरी,
ती डाकूंची नसे गुहा..
मेजाखालून, मेजावरतून
द्रव्य कुणाचे लुटू नका!
सत्ता तारक सुधा असे,
पण सुराही मादक सहज बने..
करीन मंदिरी, मी मदिरालय
अशी प्रतिज्ञा घेऊ नका…
प्रकाश पेरा अपुल्या भवती,
दिवा दिव्याने पेटतसे…
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता,
शंखच पोकळ फुंकू नका
ही कविता म्हणून दाखवत फडणवीसांनी “सरकारचे नेमके काय चालले आहे?” असा सवाल उपस्थित केला. “एसटी कर्मचाऱ्यांची ही स्थिती का झाली? आपण काय करतो?”, असे सवाल देखील त्यांनी उपस्थित केले.