Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Relation : काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यात एकत्र दिसले होते. यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) पुन्हा भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा झाली. शिवसेना भाजपाची युती झाल्यास तो माझ्यासाठी सुवर्णक्षण असेल अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटलांनी दिल्याने चर्चेला उधाण आले होते. तसंच, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातही सौहार्दाचे संबंध असल्याची चर्चा होती. दरम्यान, या सर्व चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी आता उत्तर दिलं आहे. लोकसत्ताच्या वर्षवेध कार्यक्रमात संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सौहार्दाचे संबंध तयार होत आहेत, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, याबाबत मिलिंद नार्वेकरांना जास्त माहिती असेल. त्यावर त्यांनीच हा प्रश्न विचारायला सांगितला असं संपादक गिरीश कुबेर म्हणाले. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर दिलं. ते म्हणाले, “निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि माझी सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. बाकी कधी भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की आम्ही भेटलो आणि नमस्कार केला नाही. आम्ही भेटतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. तसा संबंध आहे. साऊथ भारतात जसे नेते जान के प्यासे असतात तशी परिस्थिती महाराष्ट्रात कधी राहिली नाही. त्यामुळे संवाद करायला, बोलायला काही अडचण नाही.”
पण याचा अर्थ असा नाही की…
“उद्धव ठाकरेंना चंद्रकांत पाटील भेटले, पण त्यातून अशा बातम्या झाल्या की उद्याच उद्धव ठाकरे आमच्याबरोबरच येणार आणि चंद्रकांतदादांनी त्यांच्यासाठी पायघड्याच अंथरल्या आहे. आमच्यातील संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही, पण याचा अर्थ असा नाही की ते आता जवळ येणार आहेत.”
२०२४ या वर्षातील महत्त्वाच्या घडामोडी, घटना आणि व्यक्तिमत्वे यांची नोंद घेणारे ‘लोकसत्ता वर्षवेध’ या विशेषांकाचे तसेच ‘लोकसत्ता’मध्ये २०१७ ते २०२४ या काळात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांचा संग्रह असलेल्या ‘लोकसत्ता अग्रलेख’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी झाले. ‘एक्स्प्रेस टॉवर’च्या हिरवळीवर आयोजित करण्यात आलेल्या शानदार सोहळ्यास राज्य सरकारमधील मंत्री, राजकीय नेते यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, उद्योग विश्वातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यात फडणवीस यांनी महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, भाजपची वाटचाल, युती सरकारमधील भांडणे, उद्योजकांकडून वसूल करण्यात येत असलेली खंडणी, औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्राची कामगिरी आदी विविध मुद्द्यांवर दिलखुलासपणे भाष्य केले.