विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यासाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावरही यावरून चर्चा सुरू असून, सत्ताधारी पक्षातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर भूमिका मांडल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. “सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही; हा भाजपाचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,” अशी टीका थोरात यांनी केली.
ओबीसींच्या स्थगित करण्यात आलेल्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाच्या वतीने २६ जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. नागपूरमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनात बोलताना राजकीय संन्यास घेण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. “राज्याची सूत्रे भारतीय जनता पक्षाकडे सोपविली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतो आणि जर मी हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन,” असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या घोषणेवर बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना टीका केली.
हेही वाचा- …तर राजकीय संन्यास!; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतलं. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असंही म्हणाले होते. त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात; मात्र यापैकी काही झालं नाही”, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
हेही वाचा- “फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?; ‘ब्लेम गेम’ करून प्रश्न सुटणार नाही”
“फडणवीस म्हणाले होते, स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही; त्याचं काय झालं?” https://t.co/ipDAVCzBLw < येथे वाचा सविस्तर वृत्त#Maharashtra #DevendraFadnavis #BJP #Congress @bb_thorat @Dev_Fadnavis @INCMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/ZaYodLbNPh
— LoksattaLive (@LoksattaLive) June 28, 2021
“सत्तेसाठी काहीही बोलायचं, नंतर कृती करायची नाही, हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात. स्वतंत्र विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यानंतर काय झालं आपण सर्वांनी पाहिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” अशी टीकाही थोरात यांनी केली.