सोमवारी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा वांद्रे-कुर्ला येथील संकुलात पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारलाही लक्ष्य केलं. दरम्यान, या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – “आधी स्वत:चा पक्ष अन् आदित्य बाळाला सांभाळा, मग…”; चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. सत्ता गेल्याने हे लोक निराश आणि बावचळलेले आहेत. त्यांचा आता तोल जातोय. त्यामुळे अशा लोकांनी टीका केल्यानंतर ती किती गांभीर्याने घ्यायची, याचा विचार आता आपण सर्वांनी केला पाहिजे”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“मविआच्या नेत्यांना केवळ आमच्यावर टीका करायची आहे”
पुढे बोलताना महाविकास आघाडीवर टीकास्रही सोडलं. “मविआच्या नेत्यांना केवळ आमच्यावर टीका करायची आहे. अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांनी एकही विकासाचं काम केलं नाही. आताही ते केवळ आमच्यावर टीका करत आहेत. मात्र, आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही काल ३५० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं उद्घाटन केलं. त्यामुळे हे केवळ बोलणारे लोक आहेत. जनतेच्या प्रती यांना काही देणं-घेणं नाही”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – “बाजार समितीचा निकालाची टिमकी वाजवण्यापेक्षा…”; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर!
बारसूमध्ये आंदोलनांवरही केलं भाष्य
यावेळी बोलताना त्यांनी बारसूमध्ये आंदोलनांवरही भाष्य केलं. “बारसूमध्ये बाहेरून लोक आणून आंदोलन करण्यात येत आहे. कोकणात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काही लोक राजकीय गोळी मारण्याचा प्रयत्न करत आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.