छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेली वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये असल्याचा सरकारचा दावा आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही वाघनखे सरकार आणणार आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या वाघ नखांवरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले होते. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमने सदर वाघनखे तीन वर्षांसाठी उसनावारी देण्याचं मान्य केलं आहे. मग, हे कर्जावर आहे की परतावा आहे? परतावा असेल, शिवाजी महाराज यांचं मंदिर व्हावं आणि त्यात वाघनखे ठेवण्यात यावी. पण, ही वाघनखे शिवकालीन की शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत?” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले होते.
हेही वाचा : “लंडनमधील वाघ नखे शिवाजी महाराजांची असतील तर…”, इंद्रजित सावंत यांचं सरकारला थेट आव्हान
यावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण, संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागितले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची ही परंपरा आहे.”
हेही वाचा : वाघनखं परत आणण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार
माझ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे परदेश दौरे रद्द झाले, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. यावर “मी बालबुद्धीला उत्तर देत नाही,” असा टोला फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.