काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं होतं. ‘मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर घाला घालण्याचं काम दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून सुरु आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा आहे,’ असं विधान नाना पटोलेंनी केलं. याला आज ( १७ ऑगस्ट ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज एक मजबूत सरकार आहे. काही लोक दिवसा स्वप्न पाहतात. ‘दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे’, असं काही जण सांगतात. होय, दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे. पण, त्या खुर्चीचं रक्षण करण्यासाठी आमची नजर आहे.”
“कोणीही आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम दोन उपमुख्यमंत्री करतील,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
हेही वाचा : “दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधावा”, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
“काही लोकांनी बेईमानी केली, म्हणून…”
देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर भाष्य केलं आहे. “‘मी पुन्हा येईन’ची दहशत अजून पाहायला मिळत आहे. बुधवारी राष्ट्रीय नेते म्हणाले, ‘फडणवीसांनंतर पंतप्रधान मोदी ‘मी पुन्हा येईन’ म्हणत आहेत. पण, फडणवीस असेच आले.’ मी त्यांना एवढंच सांगतो, लोकांनी मला पुन्हा आणलं होतं. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून राज्यावर येऊ शकलो नाही,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
“…त्यांचा पूर्ण पक्षच आम्ही घेऊन आलो”
“पण, लक्षात ठेवा ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्षच आम्ही घेऊन आलो. त्यामुळे आता शंका ठेवण्याचं कारण नाही आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.