Devendra Fadnavis On Rahul Gandhi Allegations over Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत दिसणारा कल विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे बदलल्याची प्रतिक्रिया या निकालांवर व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात अनेक दावे-प्रतिदावेही केले गेले. या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप राज्यातील विरोधी पक्षांकडून अर्थात महाविकास आघाडीकडून करण्यात येत होते. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत सविस्तर आकडेवारी देऊन तीन महत्त्वाचे प्रश्न निवडणूक आयोगाला केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठा विजय मिळला. दरम्यान हा निवडणूक निकाल आणि निवडणूक प्रक्रिया याबद्दल विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हा एकच विनोद पुन्हा पु्न्हा ऐकवला जातो तेव्हा त्यावर हसू येत नाही (जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!),” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांनी ही पोस्ट काँग्रेसचे नेत राहुल गांधी यांना टॅग करत केली आहे.
भाजपाचा लोकशाहीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला
देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत अजूनही आलेले नाहीत. किंबहुना पराभवाच्या त्या धक्क्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. म्हणून आता ते मतदारसंख्येवर संशय घेत आहेत. खरं तर निवडणूक आयोगानं यापूर्वीच मतदार वाढीबाबत वारंवार स्पष्ट उत्तरं दिली आहेत, तरीही दिशाभूल करणारे आरोप करून लोकशाहीची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सातत्याने केला जात आहे”.
“उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यात होणारा पराभव आधीच दिसत असल्यामुळे राहुल गांधी यांची रडारड आतापासूनच सुरू झाली आहे. जनतेनं काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना सातत्यानं नाकारलं आहे, हे वास्तव स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही. आता पराभव लपवण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणं, हा निराशेचा कळस आहे,” असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
“खरं तर या पत्रकार परिषदेत शेजारी बसलेल्या सुप्रियाताई सुळे यांनी ‘मी याच ईव्हीएमवर विजयी झाले’ असं सांगितलं होतं. पण राहुल गांधी यांना नौटंकी करायची असल्यानं ते सत्य स्वीकारणार नाहीत. राहुलजी लोकशाहीवर विश्वास ठेवा, निराधार आरोप करून लोकशाहीची विटंबना करू नका. या देशातील जनतेला आपला खोटारडेपणा आता पुरता कळून चुकला आहे,” असे अवाहनही त्यांनी राहुल गांधींना केले आहे.