संजय राऊत उत्तर देण्याचे लायकीचे नाहीत. संजय राऊत काहीही बोलतात. उद्धव ठाकरे यांची संघटना रामराज्याबद्दल बोलत आहे. पण, त्यांनी रामराज्याची संकल्पना आधीच सोडून दिली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत काय म्हणाले?
“राम मंदिर बांधल्यानं कुणी राम होत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर जनता उभारत आहे. भाजपाचं काम करण्याची पद्धत रावणासारखी आहे. रावणानं ज्यापद्धतीनं लोकांवर अत्याचार केले. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र आणि दिल्लीतले सरकार लोकांवर अत्याचार करत आहे. रावण कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. आमचं सरकार आल्यावर रामराज्य निर्माण होणार आहे,” असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
“रामराज्याची संकल्पना ठाकरेंच्या शिवसेनेनं सोडली”
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही. कारण, संजय राऊत उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत. लायकीचे नाहीत, याचा अर्थ ते काहीही बोलतात. काहीही बोलणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचं? पण, उद्धव ठाकरेंची संघटना रामराज्याबद्दल बोलते, याचा मला आनंद आहे. रामराज्याची संकल्पना ठाकरेंच्या संघटनेनं आधीच सोडून दिली आहे.”
“वडेट्टीवार थोडीच आमचा पक्ष चालवतात”
‘राज्यातील ९ मंत्री भ्रष्टाचारी आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर हे नऊ मंत्री मंत्रिमंडळात दिसणार नाहीत,’ असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, “विजय वडेट्टीवार थोडीच आमचा पक्ष चालवतात. वडेट्टीवार यांना पक्षातून डच्चू मिळणार नाही, याची काळजी घ्यावी.”