पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर बोलताना पुन्हा सत्तेत येण्याबाबत संकेत दिले होते. याची तुलना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ वक्तव्याशी झाली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मी पुन्हा येईन’ म्हटलं तर मोदींची अवस्था फडणवीसांसारखी होईल, अशी टोलेबाजी केली होती. याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार पुढे म्हणाले, “गुजरातमध्ये भाजपाचं सरकार आहे. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचं सरकार पाडलं आणि भाजपा सत्तेत आली. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आहे. राजस्थान, दिल्ली, पंजाब, ओडिसा, झारखंड, पश्चिम-बंगालमध्ये भाजपा सत्तेत नाही.”
“याचा अर्थ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीच लोकांनी यांची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार केलेला दिसत आहे. हे चित्र आगामी निवडणुकीत दिसेल. त्यामुळे यांनी कितीही जोरजोरात सांगितलं की, ‘मी पुन्हा येईन,’ ‘मी पुन्हा येईन’ तरी मोदींची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल. याबाबत माझ्या मनात शंका नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं.
हेही वाचा : “दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपला पक्ष बांधावा”, राज ठाकरेंच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
“लोकांनी मला पुन्हा आणलं होतं. मात्र…”
शरद पवारांच्या विधानावर शिर्डीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. “‘मी पुन्हा येईन’ची दहशत अजून पाहायला मिळत आहे. बुधवारी राष्ट्रीय नेते म्हणाले, ‘फडणवीसांनंतर पंतप्रधान मोदी ‘मी पुन्हा येईन’ म्हणत आहेत. पण, फडणवीस असेच आले.’ मी त्यांना एवढंच सांगतो, लोकांनी मला पुन्हा आणलं होतं. मात्र, काही लोकांनी बेईमानी केली. म्हणून राज्यावर येऊ शकलो नाही,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता…”, जयंत पाटलांचं विधान
“पण, लक्षात ठेवा ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली, त्यांचा पूर्ण पक्षच आम्ही घेऊन आलो. त्यामुळे आता शंका ठेवण्याचं कारण नाही आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.