तपास यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार गटानं गटानं भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. २०१९ साली शरद पवार तपास यंत्रणांना घाबरून आमच्याबरोबर येणार होता का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“माझ्याकडे ६ ते ७ सहकारी आले. सरकारला पाठिंबा न दिल्यास तुरूंगात जावं लागेल. आमच्याकडे सध्या दोन पर्याय आहेत. एकतर भाजपाबरोबर जाणं किंवा तुरुंगात जाणं, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे तपास यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार गटानं भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं शरद पवार यांनी ‘इंडिया टुडे’च्या कार्यक्रमात म्हटलं.
यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “२०१९ साली शरद पवार भाजपाबरोबर येण्यास तयार होते. मग, कुठल्या तपास यंत्रणांना घाबरून तुम्ही भाजपाबरोबर येणार होता का? २०१७ सालीही आमच्याबरोबर कुठल्या यंत्रणांना घाबरून येणार होता का? त्यामुळे पक्षातील लोक बाहेर का पडले, हे शरद पवारांना माहिती आहे.”
हेही वाचा : अकोल्यात पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमात वळसे-पाटलांसमोर मिटकरींचा राडा; नेमकं काय घडलं?
“अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की, ‘राष्ट्रवादीच्या आमदारांनी सह्या करून भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांच्या मान्यतेनं सरकार बदललं.’ आता ही सगळे लोक भाजपाबरोबर आल्यावर आरोप करणं अतिशय अयोग्य आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.