मराठा आरक्षणसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे उपोषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, मला सलाईनमधून विष देण्याचा किंवा इतर मार्गांनी ठार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गंभीर आरोप जरांगे यांनी केले होते. तसेच फडणवीस अजय बारसकर, संगीता वानखेडे यांना पुढे करून, माझ्यावर गुन्हा दाखल करून मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही मनोज जरांगे म्हणाले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले, फडणवीसांनी माझ्याविरोधात षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे. परंतु, मी त्यांना घाबरणार नाही. मी फडणवीसांचा ब्राह्मणी कावा चालू देणार नाही.
फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे थेट मुंबईत येऊन फडणवीसांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर तशी घोषणादेखील केली होती. “मी मुंबईला जाईन, उपमुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यासमोर जाईन, फडणवीसांनी मला तिथे मारावं”, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला होता. परंतु, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कार्यकर्त्यांनी अंतरवालीमधून बाहेर पडू दिलं नाही. त्यानंतर मनोज जरांगे यांना उपचारांसाठी बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते सध्या उपचार घेत आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे इतर राजकीय शक्ती असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाची राज्य सरकारकडून एसआयटी चौकशी केली जाणार आहे. तसेच मनोज जरांगे हे शरद पवार यांची स्क्रिप्ट वाचत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवर थेट उत्तर देणं टाळलं होतं. अखेर आज त्यांनी यावर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या ‘ब्राम्हणी कावा’ आणि ‘सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न’ या आरोपांवर प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यावर जरांगे पाटील स्वतःच बोलले आहेत. ते म्हणाले की, ‘मी खूप दिवस उपाशी होतो त्यामुळे माझा बोलताना ताबा सुटला.’ जरांगे पाटील यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिल्यामुळे त्याकडे लक्ष देत नाही, तुम्हीदेखील (प्रसारमाध्यमं) जरांगे-पाटलांचं वक्तव्य सोडून द्या, त्यांना जाऊ द्या. मनोज जरांगे नवीन आहेत. परंतु, राजकारणातले वरिष्ठ लोकही असं वागतात.
हे ही वाचा >> मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
फडणवीसांकडून शरद पवारांच्या जुन्या वक्तव्याची आठवण
देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांसारखा माणूससुद्धा जातीवर येतो. आम्ही (भाजपाने) कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना निवडणुकीचं तिकीट दिलं तेव्हा शरद पवार किती नाराज झाले होते. तेव्हा शरद पवारांनी केलेलं वक्तव्य आठवून पाहा. शरद पवार तेव्हा म्हणाले होते की, पूर्वी छत्रपती पेशवे नेमायचे आणि आता पेशवे छत्रपती नेमायला लागलेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या वक्तव्याचं मला नवल वाटलं नाही. ते काही नवीन वक्तव्य नाही. एखाद्या व्यक्तीविरोधात बोलायला काही नसेल तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. माझ्याविरुद्ध असा प्रकार होताना मी नेहमीच पाहिलं आहे. जेव्हा त्यांना माझ्याबद्दल बोलायला कुठलाही विषय मिळत नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचे किंवा राजकीय आरोप करता येत नाहीत, अकार्यक्षमतेचे आरोप करता येत नाहीत, तेव्हा जातीवरून आरोप लावण्याचे प्रयत्न केले जातात.