शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नागपुरात कार्यकर्त्या मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला देवेंद्र फडणवीस ‘कलंकीचा काविळ’ म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ८ मुद्द्यांच्या माध्यमांतून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. तसेच, “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!,” असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
- ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचबरोबर पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
- आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
- सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
- सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
- ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
- पोलीस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
- करोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
- लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.