मंदार लोहोकरे, पंढरपूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर करून त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती व आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. नाशिक जिल्ह्यातील बबन घुगे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला.

श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि इतर अन्य मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील वर्षीच्या कार्तिकीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता संवर्धनाची संकल्पना मांडली होती, तर या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या ७३ कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील २६ कोटीच्या विविध संवर्धन विकासकामांचे भूमिपूजन आज करण्यात आले, त्याबद्दल समाधान वाटत असून हे काम अत्यंत वेगाने आणि उत्कृष्ट दर्जाचे होईल यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे.

फडणवीस म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असून श्री क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येतील. विस्थापित व्हावे लागणार नाही, तसेच कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, चंद्रभागा नदी अविरतपणे वाहत राहिली पाहिजे यासाठी नदी संवर्धनाच्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. नदी स्वच्छ राहिली पाहिजे यासाठी नदीपात्रात, नदी काठावरील सर्व गावातून येणारे पाणी हे स्वच्छ करूनच नदीत येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

अशी झाली मानाच्या वारकऱ्यांची निवड

कार्तिकी एकादशी यात्रा २०२३ निमित्त गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दाम्पत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहे. या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचे वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आले.

हे ही वाचा >> “जवळच्या माणसानेच पंकजा मुंडेंचा घात केला”; बच्चू कडूंचं थेट वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले. कार्तिकी यात्रेनिमित्त शासन आणि प्रशासनाने वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत आभार मानले. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान १२ तास लागत होते तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मंदिर समितीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सहकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली. मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर महाराज यांनीही आभार मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis request to vitthala keep people of maharashtra happy on kartiki ekadashi asc