खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दोघेही सातत्याने एकमेकांना लक्ष्य करत असतात. अनेकदा हे वाद गंभीर असतात. बुधवारी (२१ जून) सकाळीच या दोघांमधल्या वादाचं असंच एक रुप साताऱ्याच्या खिंदवाडी गावात पाहायला मिळालं. एका जमिनीच्या तुकड्यावरून दोन्ही नेते आमने-सामने आले. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. दरम्यान, या वादानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राजेंची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांना या भेटीचा तपशील विचारला. तसेच दोन्ही राजेंशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, दोघांशीही विविध प्रश्नांवर माझी चर्चा झाली. इथले काही सिंचनाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. यासंबंधी त्यांनी मला काही निवेदनं दिली आहेत. तसेच विकासकामांवरही चर्चा झाली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही राजेंना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. मला असं वाटतं की, अशा गोष्टी कधीकधी होत असतात. परंतु तिथे काहीतरी गंभीर घडतंय असं काही नाही. किंवा कुठलीही अडचणीची गोष्ट नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही राजेंबरोबर दोन तास चर्चा केली. त्यानंतर उदयनराजेंबरोबर तासभर चर्चा केली. ही चर्चा केवळ विकासकामांबाबत होती असं फडणवीस यांनी भेटीनंतर स्पष्ट केलं.

हे ही वाचा > ईडीच्या छापेमारीनंतर संजय राऊतांकडून शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांच्या घोटाळ्यांची यादी जाहीर

साताऱ्यात बुधवारी नेमकं घडलं काय?

साताऱ्यातल्या खिंदवाडी भागात बुधवारी सकाळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक भिडल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं ते एका कंटेनरचं! शिवेंद्रराजेंकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या उभारणीची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी रीतसर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी या जागेवर एक कंटेनर तात्पुरतं कार्यालय म्हणून उभा करण्यात आला होता. पण काही वेळातच सकाळी ९ च्या सुमारास उदयनराजेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कंटेनर जेसीबीच्या मदतीने उलटा केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे भूमिका मांडण्यात आली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला पांगवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis resolved udayanraje bhosale and shivendraraje quarrel asc