Devendra Fadnavis On Ajit Pawar Iftar Party Remark: राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण आहेत. राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन करत मुस्लीम समुदायाशी संवाद साधला. मुस्लीम समुदायाला धमकी देण्याचा किंवा जातीय तेढ करण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.
दरम्यान, अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांनीही चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केला तर…
मुंबईत आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मुस्लीम समुदायाला रमजानच्या शुभेच्छा देत असताना अजित पवार म्हणाले, “भारत हा विविधतेत एकतेचे प्रतिक असलेला देश आहे. विभाजनवादी शक्तींच्या जाळ्यात कुणीही अडकू नये.”
ते पुढे म्हणाले की, “तुमचा बंधू म्हणून मी तुमच्या पाठिशी उभा आहे. जर कुणी मुस्लीम बांधव आणि भगिनींना त्रास देण्याचा किंवा त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही.”
दोषींना त्याचे परिणाम भोगावे लागतील
यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “आमच्या मुस्लिम बांधवांकडे डोळे वटारणाऱ्याला सोडणार नाही” या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोणत्याही जाती किंवा धर्मातील देशभक्त व्यक्तींना त्रास देणाऱ्याला आणि दोषी आढळणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, “अजित पवार काय म्हणाले हे मला माहिती नाही, कोणत्याही जाती किंवा धर्मातील चांगले काम करणाऱ्या आणि देशभक्त व्यक्तीला त्रास दिला आणि दोषी आढळला तर त्याला सोडले जाणार नाही.”
आमचा पक्ष धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही
दुसरीकडे भाजपाचे दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “आमचा पक्ष धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ या तत्त्वावर विश्वास ठेवतो. काही लोक त्यांच्या विधानांनी वातावरण बिघडवतात. भाजपा त्यांच्या विधानांना त्यांचे वैयक्तिक विचार मानते.”