अवघ्या आठवड्याभरापूर्वीच मुंबईच्या पोलीस आयक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत काही व्हिडीओ क्लिप सादर केल्या. तब्बल सव्वाशे तासांचं व्हिडीओ फूटेज आपल्याकडे असल्याचा दावा फडणवीसांनी यावेळी केला. यातल्याच एका व्हिडीओ क्लिपमध्ये संजय पांडे यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती कोणत्या बोलीवर करण्यात आली आहे? यासंदर्भात संभाषण असल्याचा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.
विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या व्हिडीओ क्लिप!
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या संभाषणांच्या व्हिडीओ क्लिपमधील संभाषण वाचून दाखवलं. या संभाषणामध्ये त्यांनी इतर अनेक गौप्यस्फोटांसोबतच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झालेले संजय पांडे यांच्याबाबत झालेला संवाद देखील वाचून दाखवला.
अनिल देशमुखांचा संदर्भ
“अनिल देशमुखांनी बदल्यांमध्ये खूप पैसे कमावले. १०० कोटींपेक्षा जास्त.. कदाचित अडीचशे कोटी तरी असतील. अनिल देशमुख आपल्या कामी आला असता. अनिल देशमुख गेल्यामुळे खूप नुकसान झालं आहे. वळसे काहीच करत नाहीत”, असं संभाषण असलेल्या एका क्लिपमधले संवाद फडणवीसांनी वाचून दाखवले.
मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे
संजय पांडे यांची नियुक्ती
“पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला १० कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल”, असं व्हिडीओ क्लिपमधलं संभाषण देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सादर केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडाली आहे.