Devendra Fadnavis : फेब्रुवारी महिन्यात छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होऊ लागली. भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही औरंगजेबाची कबर उखडून टाका अशी मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही कबर हटवता येणार नाही असं म्हटलं आहे.

औरंगजेबाच्या कबरीचा वाद काय?

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून औरंगजेबाच्या विरोधात राज्यभरात रोष पाहण्यास मिळाला. खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनीही असाच इशारा दिला. गरज पडल्यास कारसेवा करु आणि कबर हटवू असंही या संघटनांनी सांगितलं. यानंतर औरंगजेबाच्या कबरीला ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिलं आहे. राज ठाकरे यांनीही ही कबर उखडू नका उलट तिथे फलक लावा आणि मराठ्यांनी औरंगजेबाला इथे गाडला हे सगळ्यांना सांगा अशी भूमिका घेतली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी ही कबर हटवता येणार नाही असं म्हटलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्याला आवडो न आवडो, मात्र हे मान्य करावंच लागेल की औरंगजेबाची कबर ही भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येते. या कबरीला भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षण दिलं आहे. त्यामुळे कबर तिथून हटवता येणार नाही. मात्र औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही कदापि मान्य करणार नाही. ” इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

औरंगजेबाविषयी काय म्हणाले राज ठाकरे?

“औरंगजेबाने तेव्हा परत जायला पाहिजे होतं. मात्र, एवढ्या मोठ्या बलाढ्य प्रदेशाचा राजा महाराष्ट्रात ठाण मांडून का बसला होता? कारण औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण हे औरंगजेबाला जमलं नाही, सर्व प्रयत्न केले आणि शेवटी औरंगजेब येथेच मेला. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. तेव्हा जगभरातील लोकांना कळतं की औरंगजेब काय करायला गेला होता आणि कसा मेला. तेव्हा तेथे जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले होते, “औरंगजेबाची सध्याची सजवलेली कबर काढून टाका. तेथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायाला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.