लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे आणि प्रचाराची रणधुमाळीही जोरदारपणे सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी वर्ध्यात होते. रामदास तडस यांचा अर्ज दाखल करण्याआधी वर्ध्यात जोरदार भाषण केलं. या भाषणात त्यांनी शरद पवारांचे आभार मानले. त्यांचं हे भाषण चर्चेत आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांचे मी आभार मानतो

शरद पवार या ठिकाणी येऊन गेले, मी शरद पवारांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती शरद पवारांनी करुन दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा दिला होता. आम्हाला पंजा इथून गायब करता आला नाही. वर्ध्यातून शरद पवारांनी पंजा गायब करुन दाखवला. आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं. ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसने राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यामुळे आपण सगळ्यांनीच त्यांचे आभार मानले पाहिजेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसची अवस्था काय झाली आहे?

काय अवस्था झाली आहे बघा, काँग्रेस वर्ध्यातून हद्दपार, महायुतीला इथे उमेदवार सापडेना. मग उमेदवाराचा शोध सुरु झाला. मग एक उमेदवार त्यांनी काँग्रेसमधून आयात केला. त्यांना पक्कं माहीत आहे की विधानसभेत निकाल काही बरा लागणार नाही. लोकसभेचं तिकिट घेऊन आपण शहीद व्हावं असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पण काही हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहेत. महात्मा गांधींचं वर्धा ना काँग्रेसचं ना शरद पवारांचं. वर्धा भाजपाचं आहे, नरेंद्र मोदींचं आहे, हे आता शिक्कामोर्तब झालं आहे. रामदास तडस यांनी दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेत सातत्याने भूमिका घेतली. सामान्य लोकांमध्ये ते फिरत राहिले. सातत्याने लोकांना ते उपलब्ध होते. त्यामुळेच जनतेचं विलक्षण प्रेम रामदास तडस यांना मिळालं आहे. रामदास तडस पैलवान आहेत. आमच्या पैलवानाने असा डाव टाकला की शरद पवारांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली. त्यांना सगळे डावपेच माहीत आहेत, चेहरा भोळा असला तरीही. त्यामुळे वेळप्रसंगी धोबीपछाडही देतात. रामदास तडस ६० टक्के मतांनी निवडून येतील. आधी लाट होती, आता लाट नाही त्सुनामी नाही. अब की बार ४०० पार होणार आहे असाही नारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा या देशात राबवला. मोदींनी जादू काय केली हे जगातल्या अर्थतज्ज्ञांना कळू शकलेलं नाही. २५ कोटी गरीब दारिद्र्य रेषेमखालून बाहेर आहे. सगळ्या जगाला याचं कौतुक आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. आज रामदास तडस यांचा अर्ज भरण्यात आला. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार भाषण केलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमुक्त वर्धा केल्याबद्दल शरद पवारांचे खोचकपणे आभार मानले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis said congrats to sharad pawar about this thing in wardha speech scj