राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांना पाठिंबा दिला आहे. खासदारांशी बैठक घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी (१२ जुलै) तशी घोषणा केली. त्यानंतर आता शिवसेनेच्या या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएचा भाग नसलेल्या अनेक सरकार तसेच पक्षांनी मुर्मू यांना समर्थन दिलं आहे. शिवसेनेने समर्थन दिलं असेल तर आम्हाला आनंद आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली असती तरी चांगले झाले असत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
“राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी देशभरातून स्वीकारली गेली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक पक्षावर आधारित नसते. या निवडणुकीत व्हिपदेखील नसतो. राष्ट्रपती हे सगळ्यांचे आहेत. मुर्मू या एनडीए पुरस्कृत उमेदवार आहेत. एनडीएचा भाग नसलेल्या अनेक सरकार तसेच पक्षाने मुर्मू यांना समर्थन दिलं आहे. त्यामुळे शिवसेनेनेही समर्थन दिलं असेल तर आम्हाला आनंद आहे. मुर्मू यांच्यासारख्या उमेदवाराची निवड जर बिनविरोध झाली असती तर चांगले झाले असते,” अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच आता निवडणूक होणार आहे; तर त्यांना सर्वांनीच पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> विदर्भात पावसाचा रुद्रावतार; चंद्रपुरात इरई नदी कोपली, गडचिरोलीत पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी
शिवसेनेच्या निर्णयावर काँग्रेसची नाराजी
शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. “जी व्यक्ती संविधान आणि लोकशाहीचे समर्थन करते त्या प्रत्येक व्यक्तीचे यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या उमेदवारीला सर्मथन आहे. शिवसेनेना हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. तरीदेखील त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना पांठिंबा का दिला हे समजत नाहीये,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
हेही वाचा >>> शरद पवारांनीच नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यास मदत केली; केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले “राज ठाकरेंच्या पाठीशीही…”
तर याआधी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक घेतली होती. त्यात शिवसेनेने भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी भूमिका अनेक खासदारांनी मांडली होती. निर्णयाचे सर्वाधिकार ठाकरे यांना देण्यात आले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा कसलाही दबाव माझ्यावर नव्हता. कोणालाही पाठिंबा जाहीर करा, असे खासदारांनी मला सांगितले होते, असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले.