Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. पहिल्यांदा २०१४ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर २०१९ ला ७२ तासांसाठी ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तसंच एकट्या भाजपाला १३२ जागा मिळाल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याच्या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाली. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर काय वाटतं? याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. तसंच व्यक्ती म्हणून आणि राजकीयदृष्ट्या मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि त्यातून प्रगल्भता आली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“मागच्या दहा वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय म्हणतात तसं झालं आहे. मला आलेले अनुभव असेच आहेत. दहा वर्षांपूर्वी लोक संशयाने बघायचे की हा व्यक्ती कधी मंत्रिपदावरही आला नाही आणि मुख्यमंत्री झाला तर हा काही करु शकेल का? पाच वर्षांच्या पूर्ण कार्याकाळानंतर मी आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा लोकांनी मी काय करु शकतो किंवा माझी क्षमता काय ते बघितलं, अनुभवलं” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर…
एक व्यक्ती म्हणूनही अनेक आव्हानांचा सामना केला आहे की त्यातून आता परिपक्वता आली आहे. आता मला आव्हानांची चिंता वाटत नाही किंवा मल्टिटास्किंग म्हणतो तशी आव्हानं पेलत असताना, आपला अजेंडा ढळू द्यायचा नाही. आपल्या अजेंड्यावर आपण चालत राहायचं असा माझा प्रयत्न असणार आहे. मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र वेगाने पुढे गेला असता. २०१९ ते २०२४ या कालावधीत महाराष्ट्रात काय काय घडलं हे मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण त्यामुळे विकासाची गती होती तिला खिळ बसली होती. २०२२ नंतर आपण पुन्हा विकासाला गती दिली आहे. आता दाव्याने हे सांगतो आहे की महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही असा महाराष्ट्र पाहण्यास मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळ पीपीएफच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
गतीशिलता आणि पारदर्शका या दोन्हीचा समावेश आमच्या प्रशासनात-फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही गतीशिलता आणि पारदर्शी कारभार या दोन्हीचा समावेश आमच्या प्रशासनात आहे. राज्यकर्त्यांनी प्रशासन योग्य पद्धतीने चालवायचं असतं. मागच्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीचं प्रशासन बदलून टाकलं. दिल्लीचं राजकारण म्हणजे ठगांचं राजकारण, दलालांचं राजकारण आहे असं म्हणायचे. आता तिथे ठगही सापडत नाहीत आणि दलालही सापडत नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. FDI च्या बाबतीत आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. साधारण १० ते १५ वर्षांपूर्वी MoU करण्याची पद्धत होती. आता मात्र ती परिस्थिती मुळीच नाही. खरोखर MoU केले जातात असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.