Devendra Fadnavis : भाजपामुळे आज महाराष्ट्रात सहा पक्ष तयार झाले आहेत का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला असता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फुटायला उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी फुटायला शरद पवार जबाबदार आहेत असं म्हटलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

२१ जून २०२२ ला शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केलं. त्यांना ४० आमदारांची साथ लाभली त्यानंतर महाविकास आघाडी सरकार गडगडलं. कारण २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाविकास आघाडीचा प्रयोग अशा प्रकारे भेदण्यात आला. त्यानंतर बरोबर एक वर्ष आणि दोन दिवसांनी म्हणजेच २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी महायुतीत येणं पसंत केलं. त्यांच्यासह ४१ आमदारही महायुतीत आले. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मोठा झटका बसला. आता या सगळ्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि शरद पवारच जबाबदार आहेत असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“एक काळ असा होता की काँग्रेसचे लोक म्हणायचे यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात होता, आत्ताही काही प्रमाणात हे बोललं जातं. मात्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन पक्ष सत्तेच्या लढाईमुळे फुटले आहेत. आपल्या मुलाला, मुलीला पक्षाचा वारसा द्यायचा आहे या महत्वाकांक्षेने त्यांचा घात केला” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांचा पक्ष आम्ही फोडू शकतो का?

“शरद पवारांचा पक्ष आम्ही फोडू शकतो का? ज्यांनी आयुष्यभर लोकांचे पक्ष फोडले त्यांचा पक्ष भाजपा कशी काय फोडू शकते? शरद पवारांचा पक्ष त्यांनीच फोडला. कारण नैसर्गिकदृष्ट्या त्यांचा वारसा त्यांनी इतक्या वर्षांपासून अजित पवारांकडे दिला होता. आता त्यांना वाटलं की सुप्रिया सुळेंकडे वारसा असला पाहिजे. राजकारणात घराणेशाही असलेले पक्ष असतात त्यांची अवस्था अशीच होते. अजित पवारांना जेव्हा वाटलं की आता माझं राजकारणच संपेल त्यावेळी ते आमच्याबरोबर आले.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी News 18 ला मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदेंनाही कळलं होतं..

शिवसेनेत एकनाथ शिंदेंना जेव्हा हे जाणवलं की ज्या काही तडजोडी चालल्या आहेत त्या सगळ्या आदित्य ठाकरेंसाठी चालल्या आहेत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनाच पक्ष सोपवायचा आहे. एकनाथ शिंदेंचं महत्त्व वाढलं होतं ते कमी करुन आदित्य ठाकरेंकडे पक्ष सोपवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे शिवसेना फुटली. शिवसेना मोठी झाली हिंदुत्वामुळे, हिंदुत्व सोडल्यानंतर लोकांकडे जाऊन मतं मागायची कशी? हा प्रश्न एकनाथ शिंदेंना पडला होता. त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले आणि शिवसेना फुटली. आम्ही राजकारणात भजन करायला आलो नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले तेव्हा आम्ही सरकार स्थापन केलं. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.