Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना पराभूत करु शकतो असा आत्मविश्वास काही लोकांमध्ये आला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातील कणेरी मठ या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. तिथे त्यांनी हे विधान केलं. तसंच उद्धव ठाकरेंनी जी अमित शाह यांच्यावर टीका केली त्यावरुन विचारलं असता उद्धव ठाकरेंनी आरसा बघण्याची गरज आहे असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी आरसा पाहिला पाहिजे

उद्धव ठाकरेंनी आरसा बघावा. ज्या ३७० कलमामुळे काश्मीर भारतापासून दूर झालं होतं ते कलम ३७० मोदी आणि अमित शाह यांनी हटवलं. देशात ज्या प्रकारे सांस्कृतिक पुनरुत्थान पाहण्यास मिळतं मग राम मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल हिंदू म्हणून ओळख पुसण्याचा जो प्रयत्न होता तो मोडून काढण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलं आहे. त्यांना अशाप्रकारे संबोधणं हे जे करतात त्यांनी आरशात चेहरा पाहून घ्यावा.असा टोला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी लगावला.

लव्ह जिहादचे १ लाखांहून अधिक प्रकार

एक काळ असा होता की लव्ह जिहादबाबत बोललं जायचं तर आम्हालाही वाटायचं की लव्ह जिहादची एखादी घटना आहे. पण आज दहा वर्षांनी पाहतो आहे की एक लाख प्रकरणं समोर आली आहे. हिंदू समाजातल्या मुलींना पळवून नेऊन लग्न केलं. दोन धर्मांतल्या व्यक्तींचं लग्न झालं तर काही अडचण असण्याचं कारण नाही. पण खोटी ओळख सांगायची, खोटं बोलून फसवायचं आणि लग्नानंतर दोन-तीन मुलं झाली की सोडून द्यायचं असं वागणं चाललं आहे. हे षडयंत्र चाललं आहे. हे लव्ह जिहाद आहे. आमच्या समाजातल्या मुलींना नासवण्याचं काम चाललं आहे. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “आधी काहीतरी करुन दाखवा नंतर छात्या बडवा”, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला

लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद

यानंतर निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत आपण पाहिलं कशाप्रकारे व्होट जिहाद पाहण्यास मिळाला. काय अर्थ आहे व्होट जिहादचा? धुळ्यासारखी जागा ज्या जागेवर पाच विधानसभेत १ लाख ९० हजार मतांनी पुढे असलेला उमेदवार हा मालेगाव मध्य या एका विधानसभेत १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि ४ हजार मतांनी निवडणूक हरतो. निवडणुकीतली हार-जीत महत्त्वाची नाही. कधी हा पक्ष तर कधी तो पक्ष जिंकेल पण काही लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे की आमची संख्या कमी असली तरीही आम्ही संघटित मतदान करुन हिंदुत्ववाद्यांना पराभूत करु शकतो. आपण म्हणतो ना म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो आहे. तशा प्रकारे काळ सोकावतो आहे. या निवडणुकीतला व्होट जिहाद आहे त्यात ४८ पैकी १४ मतदारसंघांमध्ये अशा जिहादी पद्धतीने आपल्याला मतदान होताना दिसलं आहे. असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.