मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत असं काहीसं वक्तव्य केलं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. नागपूर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. दिवंगत विलासजी फडणवीस यांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पहाटेच्या शपथविधीची आठवण करुन देत देवेंद्र फडणवीस यांनी एक खास वक्तव्य केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळ प्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक पद्धतीने मला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरंच काही आलं. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कडून शिकलो ” असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

विलासजी फडणवीस यांच्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“विद्यार्थी चळवळीत असतांना मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. एक स्वयंसेवक म्हणून आपल्या परिने समाजाला योगदान द्यायचं हे मी निश्चित केलेले होते. स्वयंसेवकाला जे सांगितलं ते त्यानं करायचं असतं असं विलासजी फडणवीस यांनी सांगितलं, ज्यामुळे माझ्यापुढे काहीही पर्यायच त्यांनी ठेवला नाही, राजकारणात सहनशक्तीचा कस लागतो. समाजात जे काही चांगले दिसलं तर मी त्यापासून शिकत आलो आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीकोनातून जे प्रकल्प हाती घेतले ते त्याच शिकवणुकीतून मी पूर्ण करत आलो. स्वर्गिय विलासजी फडणवीस यांच्यातील उपक्रमशिलतेचा गुण मी अंगिकारला असे सांगून त्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. कॅन्सर इन्स्टिट्युट पासून इतर संस्था या समाजाला योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींप्रतिची एक कृतज्ञता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत काय म्हणाले मुख्यमंत्री?

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही आपण आणली पाहिजे. सर्वसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अधिक सकारात्मक, आश्वासक झाला पाहिजे यादृष्टीने मी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर अगोदर हे जाहीर केले आहे . कोणत्याही खोट्या आरोपातून केलेल्या नकारात्मक वातावरणाला आता समाज मान्यता देत नाही हे या निवडणुकीतून सिद्ध झालं आहे. एका दृष्टीने कलुषित झालेल्या राजकारणाला लोकांनीच शुद्ध करण्याकरीता घेतलेला हा पुढाकार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राजकारणात कोणीही कायमचे शत्रू नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला असं एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.

Story img Loader