Devendra Fadnavis : कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची आज १२५ वी जयंती आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दादासाहेब कन्नमवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुमासदार भाषणही केलं. या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावल्याची चर्चा आहे.

दादासाहेब कन्नमवार यांच्याबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“दादासाहेब कन्नमवार यांनी जास्त शिक्षण न घेताही त्यांनी आपलं व्यक्तिमत्व तयार केलं. महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचा एक मोठा पगडा कन्नमवार यांच्यावर होता. त्या विचारातून त्यांचं नेतृत्व तयार होत गेलं. त्या काळात ते वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी झाले, त्यांनी कॉग्रेसचं काम सुरु केलं. आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही, अशा प्रकारची ती सर्व मंडळी होती. त्यामुळे त्यांनी एक मोठं संघटन उभं केलं. ज्या वेळी संयुक्त महाराष्ट्र तयार झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न होता तेव्हा विदर्भातील ५४ आमदारांचं मत होतं की आताच वेळ आहे. आपण आताच वेगळ्या विदर्भासाठी मागणी करू. मात्र, तेव्हा दादासाहेब कन्नमवार यांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही. आता आपण महाराष्ट्र एकत्रित केला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. मग तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिमागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे दादासाहेब कन्नमवार यांच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांना त्या काळात एक मोठं पाठबळ मिळालं”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला?

चंद्रपूर जिल्ह्याच्या ज्या काही अडचणी त्या आपण सगळे मिळून सोडवू. त्यामुळे जिल्ह्याला वाली नाही असं म्हणता येणार नाही. आपण सगळेच वाली आहोत, सुग्रीव कुणीही नाही. हा कुणासारखा जोक झाला ते सांगत नाही तुम्हाला माहीत आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना हा टोला लगावला अशी चर्चा आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीची चर्चा

मारुतीराव कन्नमवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे आमदार किशोर जोरगेवार होते. तसेच या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमात भाजपाचे नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित नव्हते. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र वैयक्तिक कारणामुळे ते कार्यक्रमाला गेले नाहीत असंही वृत्त समोर आलं.

Story img Loader