उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांना काळजी करू नये, असं म्हणत पूर्ण पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारने जे दिलंय ते मागील ७० वर्षात कुणीच दिलेलं नाही, असा दावाही केला. ते रविवारी (१० सप्टेंबर) राणा दाम्पत्याने अमरावतीत आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी अगदी दाव्याने सांगतो की, अमरावती जिल्ह्याला मोदी सरकारने आणि आमच्या सरकारने जे दिलंय ते गेल्या ७० वर्षात मिळालेलं नाही. माझा दावा आहे की, आजपर्यंत सर्वात जास्त कुणी दिलं असेल, तर ते आमच्या सरकारने दिलं आहे. या कामात नवनीत राणा आणि रवी राणा पुढाकार घेऊन काम करत आहेत याचा मला आनंद आहे.”
“नवनीत राणांनी काळजी करू नये, लोकांचं त्यांच्यावर खूप प्रेम”
“मी नवनीत राणांना या निमित्ताने सांगू इच्छितो की, त्यांनी काळजी करू नये. लोकांचं नवनीत राणांवर खूप प्रेम आहे. त्या मोदींसाठी काम करत आहेत. या देशात जो मोदींना साथ देईल त्याला लोक निवडून देतील. म्हणून आमचं सरकारही पूर्णपणे त्यांच्या पाठिशी उभं आहे. आपण मोदींच्या नेतृत्वात चांद्रयान उतरवलं. चंद्राच्या दक्षिण धृवावर यान उतरवणारा पहिला देश भारत आहे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
“आपण इंडिया माता की जय म्हणतो का?”
फडणवीस पुढे म्हणाले, “भारत माता की जय म्हणायला किती चांगलं वाटतं. इंडिया माता की जय म्हणायला चांगलं वाटतं का? आपण इंडिया माता की जय म्हणतो का? आपण भारत माता की जय म्हणतो. भारताचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात. ते सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करतील. तुमचा आशीर्वाद पाठिशी असू द्या.”
हेही वाचा : “मनोज जरांगे पाटील अत्यंत फकीर माणूस, मी जेव्हा…”; अण्णा हजारेंचा उल्लेख करत राऊतांचा हल्लाबोल
“श्रीकृष्ण अमरावती जिल्ह्याचे जावई”
“श्रीकृष्ण अमरावती जिल्ह्याचे जावई आहेत. त्यामुळे प्रभु श्रीकृष्णाचं आणि आमचं जे नातं आहे त्यामुळे हा प्रेमाचा काला प्रत्येकापर्यंत पोहचवण्याचं काम आपण निश्चितपणे करू,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.