Devendra Fadnavis on FDI : गेल्या १० वर्षांतील विक्रमी विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment – FDI) महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यांत आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट करून विविध राज्यांत आलेल्या विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी मांडली असून विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशातील नंबर एकचे राज्य ठरल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की गेल्या १० वर्षांमधील कुठल्याही एका वर्षांत आलेल्या विदेशी गुंतवणुकीपेक्षा अधिक गुंतवणूक यंदा केवळ नऊ महिन्यांत प्राप्त झाली आहे. या वर्षाची एक तिमाही बाकी असून या आर्थिक वर्षांत राज्यात विक्रमी विदेशी गुंतवणुकीची नोंद होईल. दरम्यान, फडणवीस यांनी सांगितलं की विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने आपलाच जुना (२०१६-१७) विक्रम मोडला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने विदेशी गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील पहिल्या नऊ महिन्यांत आतापर्यंत एकूण १,३९,४३४ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक गुंतवणूक आहे. असे करताना महायुती सरकारने आपलाच २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे.
महाराष्ट्राला कर्नाटक-गुजरातची टक्कर
मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.” डणवीसांनी देशातील सर्वाधिक विदेशी गुंतवणूक मिळवणाऱ्या टॉप १० राज्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकचा दुसरा क्रमांक लागतो. त्यानंतर अनुक्रमे गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांचा नंबर लागतो.
राज्यातील विदेशी गुंतवणुकीची आकडेवारी
२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी
२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी
२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी
२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी
२०२४-२५ (एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात) : १,१३,२३६ कोटी