अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती सध्या बरी नसून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोल्यातील प्रचारसभेत बोलताना धोत्रेंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. नाना पटोले गुरुवारी (४ एप्रिल) अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेत म्हणाले, “खासदार संजय धोत्रे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. परंतु, भाजपावाले निवडणुकीत त्यांचं व्हेंटिलेटर काढतील.” त्यानंतर पटोले यांनी सारवासारव करत संजय धोत्रे त्यांचे मित्र असल्याचे सांगितले. पटोले यांच्या वक्तव्यावरून वाद पेटण्याची चिन्हे असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले गुरुवारी अकोल्यात आले होते. यावेळी स्वराज्य भवन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले, ‘भाजपामध्ये असताना २०१४ ते २०१७ पर्यंत खासदार होतो. ज्यावेळी जीएसटी आणि नोटाबंदी आली, त्यावेळी नरेंद्र मोदींचा समोरासमोर विरोध केला. त्यावेळी अकोल्याचे विद्यमान खासदार देखील तिथे उपस्थित होते. ते आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचं व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण ते निवडणुकीतच काढतील.
हे ही वाचा >> “…तेव्हा वरिष्ठांनी नाना पटोलेंना पकडलं, त्यानंतर मविआच्या बैठकीला थोरातांना पाठवू लागले”, ‘वंचित’चा गंभीर आरोप
पटोले यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांची नाराजी जाही केली आहे. फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ (निवडणुकीचा जाहीरनामा) जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात? हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. निवडणुकीत आपण विरोधक असलो तरी विरोधकांच्या मृत्यूची कामना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तत्काळ माफी मागा! खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.