Devendra Fadnavis on Demands of Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्धारास १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी काही मागण्या केल्या. तर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच कार्यक्रमात उदयनराजे यांच्या मागण्या मान्य केल्या.

उदयनराजे त्यांच्या भाषणात म्हणाले की “छत्रपती शिवाजी महाराजांसह आपल्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समग्र इतिहासाचं सरकारने प्रकाशन करावं.” उदयनराजेंच्या या मागण्यां मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खासदार उदयनराजे भोसले यांनी आज ज्या मागण्या केल्या, त्यासंदर्भात आमचं (सरकारचं) त्यांच्याशी बोलणं झालं आहे. यावर आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर आपण योग्य ती कारवाई करणार आहोत. यासह आमचं सर्वांचंच असं मत आहे की आपल्या महापुरुषांचा, छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटून दिलं पाहिजे. परंतु, आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर लोकशाही अनुरूप कारवाई होईल. लोकशाही अनुरूप कठोर नियम करण्याचं आम्ही निश्चित केलं आहे.”

मुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास हा राज्य सरकारच्या वतीने तयार केला पाहिजे अशी मागणी देखील उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आम्हालाही ती मागणी योग्य वाटते. राज्य सरकारच्या वतीने असा प्रमाण इतिहास तयार केला पाहिजे. आम्ही निश्चितपणे हे कामही लवकरच हाती घेऊ.”

उदयनराजेंनी केलेल्या प्रमुख मागण्या

  • छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा झाली पाहिजे असा कायदा करावा. त्या व्यक्तीला या प्रकरणात जामीन मिळू नये.
  • राज्य सरकारने शिवरायांचा समग्र इतिहास प्रकाशित करावा. यासाठी सेन्सॉर बोर्डही स्थापन करण्यात यावं. एखादा माणूस कादंबरी लिहितो पण त्याला काही पुरावे नसतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत गैरसमज होतात ते अशा गोष्टींमुळेच. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड गरजेचं आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचं दिल्लीत स्मारक झालं पाहिजे ही देखील शिवभक्तांची मागणी आहे.
  • शहाजीराजे भोसले यांच्या समाधीसाठी पुरेसा निधी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने उपलब्ध करुन द्यावा.
  • पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं. राज्यपालांच्या निवासस्थानाजवळ तरी ते स्मारक तयार करण्यात यावं अशी माझी मागणी आहे.