Devendra Fadnavis Expresses on Memes Made on Maharashtra Politics and Mayayuti : निर्विवाद बहुमताची ‘दुर्मीळ चीज’ महाराष्ट्रातल्या मतदारांनी महायुतीकडे सोपवल्यानंतरही तीन पक्षांमध्ये १३ दिवस चर्चा, बैठका, नाराजीनाट्य चालू होतं. अखेर तिघांचे सूर जुळले! पाच डिसेंबरच्या गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक केंद्रीय मंत्री, वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह जनसमुदायाच्या साक्षीने आणि अर्थातच राज्यपालांच्या उपस्थितीत महाराष्ट्राला पाच वर्षांच्या खंडाने लाभलेल्या स्थिर सरकारची मैफल जमली. मुंबईतील आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून स्पष्ट नकार मिळाल्यानंतर शिंदेंनी आपला मोर्चा गृहमंत्रीपदाकडे वळवला. मात्र, भाजपानेही राज्याचं गृहमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली नाही. परिणामी शिंदेंचं नाराजीनाट्य पाहायला मिळालं. शिंदे तडकाफडकी सर्व बैठका रद्द करून त्यांच्या गावी (साताऱ्यातील दरे गाव) निघून गेले. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्याचं सांगण्यात आलं. या सगळ्यात महायुती १३ दिवस सत्तास्थापन करू शकली नाही.
महाराष्ट्राबरोबर झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल झाहीर झाला होता. निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनी झारखंड मुक्ती मोर्चाने सत्तास्थापन (स्पष्ट बहुमताच्या आधारावर) केली. मात्र बहुमतापेक्षा ९० जागा अधिक मिळूनही महायुती १३ दिवस सत्तास्थापन करू शकली नव्हती. यामुळे महायुतीच्या अंतर्गत कारभारावर टीका होऊ लागली होती. सत्तास्थापनेस होत असलेली दिरंगाई थट्टेचा विषय बनली होती. हीच थट्टा समाजमाध्यमांवरही पाहायला मिळाली. महायुतीच्या कारभारावरून चिमटे काढणारे अनेक मीम्स समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. यातले अनेक मीम्स आम्ही देखील पाहत होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलं. तसेच आम्ही तिघे (मी, एकनाथ शिंदे व अजित पवार) हे मीम्स एकमेकांना पाठवायचो असंही त्यांनी कबूल केलं. फडणवीस यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी सांगितल्या. यावेळी फडणवीसांनी त्यांना आवडलेले मीम्सही त्यांनी शेअर केले.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! योजनेच्या पडताळणीबाबत शिंदेंच्या शिवसेनेकडून सरकारची भूमिका स्पष्ट
फडणवीसांनी सांगितलं त्यांना आवडलेलं मीम
ऱ
यावेळी फडणवीसांना मुलाखतकाराने विचारलं की आम्ही एक मीम पाहिलं ज्यात अजित पवार फडणवीसांना म्हणतायत की आपण पुन्हा एकदा पहाटे शपथ घेऊ, एकनाथ शिंदे ऐकत नसतील तर आपण दोघे शपथविधी उरकून टाकू. आपल्याकडे बहुमत देखील आहे. असे मीम्स पाहून अनेकांना प्रश्न पडला की अजित पवारांकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून असा एखादा प्रस्ताव आला होता का? यावर फडणवीस म्हणाले, “असा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. मात्र मी एक गोष्ट मान्य करतो की आमच्यावर असे वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स येत होते, व्हायरल होत होते. तसा काही प्रस्ताव आला नसला तरी आमचं मनोरंजन मात्र होत होतं. आम्ही तिघांनी असे अनेक मीम्स एकमेकांना शेअर केले. यामध्ये एक मीम्स असं होतं, ज्यामध्ये अजित पवार खुर्चीवर बसले आहेत. त्यांच्या मागे उपमुख्यमंत्री अशी पाटी दिसतेय आणि ते म्हणतायत की इथे कोणाला तरी (मुख्यमंत्री म्हणून) बसवा. उपमुख्यमंत्री म्हणून मी पर्मनंट आहे. असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स येत होते.