Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Assembly Session : प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करत इतिहासकार इंद्रजीत सावंतांना धमकी दिली होती. त्याआधी अभिनेता राहुल सोलापूरकर याने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चुकीचे दावे करून महारजांचा अपमान केला होता. यावरून राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. हाच संताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडला. तसेच कोरटकर व सोलापूकरवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच पाटील यांना उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जाईल.”

देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत. ते जयंत पाटील यांना म्हणाले, “जयंतराव, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अत्युच्च आदरभाव असलेलं हे सरकार आहे. आम्ही कधीही छत्रपतींच्या कुटुंबाला ते शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे दाखले मागितले नाहीत. तुम्ही खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वारसदार आहात का असा दाखला मागणाऱ्यांपैकी आम्ही नाही. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणूनच आपण सगळे इथे आहोत, हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. हे वक्तव्य करत फडणवीस यांनी नामोल्लेख टाळत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पाच वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे ते शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले होते. उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना त्यांनी पक्षाच्या नावातून ‘शिव’ शब्द काढून ठाकरे सेना असं नाव करावं, असा टोला लगावला होता. शिवसेनेकडून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर राऊत म्हणाले होते की “उदयनराजे भोसले भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत.”

शरद पवार जाणते राजे : संजय राऊत

संजय राऊत यांनी त्यावेळी शरद पवार हे जाणते राजे असल्याचं सांगत उदयनराजेंच्या टीकेचा समाचार घेतला होता. “शरद पवार हे जाणते राजे आहेतच. त्यांना जनतेने ही उपाधी दिली आहे. शिवसेना प्रमुख स्वत: म्हणाले नाहीत की ते हिंदूह्रदयसम्राट आहोत. शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, लोकांनी त्यांना राजा मानलं. महाराष्ट्रात देशासाठी, समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करणारा माणूस जनतेचा राजा आहे. आम्हीही शरद पवारांना तो मान देतो.”