राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होत आहे. या पुस्तकावरून सध्या राजकीय चर्चांना उधाणं आलं आहे. या पुस्तकात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केलं आहे. त्यामुळे माध्यमांच्या प्रतिनिधींनी लगेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठलं. दोघांचीही या पुस्कावर प्रतिक्रिया विचारली. यावर अजित पवार म्हणाले, मी अजून पुस्तक वाचलेलं नाही. मी आधी पुस्तक वाचेन आणि मग त्यावर बोलेन.
‘लोक माझे सांगाती’ हे शरद पवारांचं आत्मचरित्र याआधीच प्रकाशित झालं आहे. राज्यात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या राजकीय आत्मचरित्रांपैकी हे एक आहे. पंरतु या पुस्तकात शरद पवारांचा २०१५ पर्यंतचा राजकीय प्रवास वाचायला मिळत होता. आता या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीमध्ये २०२२ पर्यंतच्या राज्यातल्या राजकीय घडामोडींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या २०१९ मधील पहाटेच्या शपथविधीबाबत वाचण्याची उत्सुकता होती. त्यावर या पुस्तकात शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सविस्तर व्यक्त केल्या आहेत. अजित पवारांनी माझ्या नावाचा गैरवापर केला आणि भाजपचा तो रडीचा डाव होता, असा उल्लेख या पुस्तकात त्यांनी केला आहे.
हे ही वाचा >> “…म्हणून मी अजित पवारांवर टीका करणार नाही”, नितेश राणेंचं वक्तव्य; म्हणाले, “दादांना सगळं माफ…”
दरम्यान, माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारलं. तर फडणवीस त्यावर म्हणाले, पवार साहेबांचं पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यावर मी कमेंट करणार नाही. पण तो जो सगळा एपिसोड आहे यावर मी योग्यवेळी पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी तुम्हाला समजेल काय झालेलं.