Devendra Fadnavis Shirala Rally: पाऊस आणि निवडणुकीची जाहीर सभा, हे समीकरण महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून प्रस्थापित झाले. शरद पवार यांनी सातारा येथे लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त पावसात सभा घेतली आणि उदयनराजे भोसले यांचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे भरपावसात घेतलेल्या सभांमुळे विजय प्राप्त होतो, अशा समीकरणाची राज्यात चर्चा होऊ लागली. आज सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सत्यजीत देशमुख यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा संपन्न झाली. यावेळी फडणवीस भाषणाला उभे राहताच पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसातच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, सत्यजीतदादा आता तुमची सीट निवडून येणार, हे पक्के झाले आहे. कारण मी आता पावसात सभा घेत आहे. पावसात सभा घेतली की, विजय होतोच. हा शुभ संकेत आहे. नेत्यांचे (शरद पवार) म्हणणे आहे की, पावसात सभा झाली की विजय होतोच. पण मी तुम्हाला सांगतो, पाऊस पडो या ना पडो. पण भाजपाच्या बाजूने मतांचा पाऊस पडणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, सत्यजीत देशमुख यांचे वडील शिवाजीराव देशमुख यांना आम्ही सभागृहात पाहायचो. ते वेगळ्या पक्षात असले तरी प्रेरणा घ्यावी, असे ते व्यक्तिमत्व होते. त्यांचा प्रत्येक गुण मला सत्यजीतमध्ये दिसतो. त्यामुळे आपल्याला सुसंस्कृत आणि जमिनीवर काम करणारा नेता आपल्याला उमेदवार म्हणून मिळाला आहे.
पाऊस बघून शरद पवारांच्या सभांचं नियोजन
उद्या कुठे पाऊस पडणार आहे? हे पाहून शरद पवारांच्या सभांचे नियोजन केले जाते, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला. पवार साहेब पावसात भिजले, म्हणून एखाद्या मतदारसंघात त्यांचा विजय होतो, हा भ्रम आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीला हे लागू होत नाही, असेही विधान विनोद तावडे यांनी केले आहे. आज इचलकरंजी येथे शरद पवार भाषण करत असताना पावसाचे आगमन झाले, त्यानंतर विनोद तावडे यांनी हा आरोप केला.