भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे, असं विधान बावनकुळेंनी केलं आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपस्थित लोकांना संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भाषणात म्हणाले, “जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्यान देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपाचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात.”

खंर तर, हा कार्यक्रम तेली समाजाने आयोजित केला होता. या कार्यक्रमाला ओबीसी समाजाचे अनेक लोक उपस्थित होते. यावेळी बावनकुळेंनी हे विधान केलं आहे. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात. म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की २०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले पाहिजेत? असा प्रश्न विचारत बावनकुळेंनी लोकांकडूनच प्रतिसाद घेतला. लोकांनी ‘मुख्यमंत्री’ असं उत्तर दिल्यानंतर बावनकुळेंनी संबंधित विधानाला सहमती देत पुढील भाषण केलं.