राज्यातील विजेची मागणी माहीत असूनही केवळ टक्केवारी मिळत नसल्याने तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने वीजनिर्मिती केली नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला. भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ देवळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. जनतेने एकहाती सत्ता दिल्यास राज्याच्या सर्वागीण विकासाबरोबर स्थानिक संस्था कर बंद केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करण्याचे टाळत काँग्रेस व राष्ट्रवादीवर शरसंधान साधले.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या सभेत फडणवीस यांनी स्थानिक आमदारांच्या सोबतीने पंतप्रधानांशी चर्चा करून कांदा प्रश्नासह शेतकऱ्यांच्या अन्य अडचणींवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. केंद्रात सत्ता आल्यावर अवघे काही महिने झाल्यावर विरोधक मोदींनी काय केले, असा प्रश्न विचारत आहेत. राज्यात १५ वर्षे तसेच केंद्रात ६० वर्षांची सत्ता असताना त्यांनी काय केले, याचा आधी खुलासा करावा, असे आवाहन त्यांनी केले. सध्या काँग्रेसकडून महाराष्ट्र पहिलाच अशी जाहिरात करण्यात येत आहे. महाराष्ट्र नक्की पुढून की मागून पहिला हे काँग्रेसने सांगावे, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात सध्या महिला सुरक्षित नाहीत. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना गृहमंत्री जर असे विधान करत असेल तर अशा लोकांच्या हाती सत्ता का सोपवावी असा प्रश्नही त्यांनी केला. राज्यात सध्या भारनियमन सुरू आहे. राज्याची विजेची मागणी माहीत असतानाही केवळ कमिशन मिळत नसल्याने तत्कालीन राज्य सरकार वीजनिर्मिती करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला आहे. राज्यात स्वच्छता करायची असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घाण आधी साफ झाली पाहिजे तरच राज्य स्वच्छ होईल. यासाठी मतदारांनी भाजपला लोकसभेप्रमाणे एकहाती सत्ता देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एकहाती सत्ता आल्यास राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न होतील तसेच राज्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देताना अभ्यासक्रम बदलण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. युवा वर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. स्थानिक संस्था कर बंद करण्यात येईल. ठिकठिकाणी उभारलेल्या टोलनाक्यांचा अभ्यास करत त्यातील अनावश्यक टोलनाके बंद करण्यात येईल अशी आश्वासने फडणवीस यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2014 रोजी प्रकाशित
टक्केवारी न मिळाल्याने काँग्रेसकडून राज्यात वीजनिर्मिती नाही -देवेंद्र फडणवीस
राज्यातील विजेची मागणी माहीत असूनही केवळ टक्केवारी मिळत नसल्याने तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाने वीजनिर्मिती केली नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

First published on: 14-10-2014 at 01:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis slams congress over shortage of electricity