Devendra Fadnavis : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. २६ ऑगस्टला ही घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारवर प्रचंड टीका केली जाते आहे. महाराष्ट्र सरकारला शिवद्रोही असं संबोधत आणि या घटनेचा निषेध करत महाविकास आघाडीने मुंबईत निषेध मोर्चा आणि जोडे मारो आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाबाबत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. हे सगळं आंदोलन म्हणजे देखावा आहे असं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच काँग्रेस माफी मागणार का? असाही सवाल देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. मात्र देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका केली आहे.
हे पण वाचा- Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला, “काही लोकांना रोज माझा राजीनामा मागितल्याशिवाय..”
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“आज महाविकास आघाडीचं जे आंदोलन होतं आहे ते पूर्णपणे राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडी असो किंवा काँग्रेस कुणीही छत्रपती शिवरायांचा सन्मान केला नाही. पंडीत नेहरु, इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यावरुन केलेली भाषणं आठवा. एकाही भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. पंडीत नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा अपमान केला. याबद्दल महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्ष माफी मागणार का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केला.
शिवरायांनी सूरत लुटली ही काँग्रेसची शिकवण
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? काँग्रेसने सातत्याने शिवरायांचा अपमान केला. आधी त्यांनी देशाची आणि जगभरात जे शिवप्रेमी आहेत त्यांची माफी मागितली पाहिजे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.