Devendra Fadnavis Speech in Vidhan Parishad: छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानांमुळे चर्चेत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. अबू आझमींवर अशाच एका विधानासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता सोलापूरकर व कोरटकर यांच्यावर कारवाईची मागणी विरोधकांनी विधानपरिषदेत आक्रमकपणे मांडल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली आहे. यावरून विरोधकांना लक्ष्य करतानाच फडणवीसांनी थेट भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख केल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

काय घडलं विधानपरिषदेत?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. मंगळवारी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मुद्द्याची अधिवेशनात जोरदार चर्चा पाहायला मिळाली. बुधवारी विधानपरिषदेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर यांच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारायला सुरुवात केली. “अबू आझमींचा आम्ही निषेध केला. त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आपण सगळ्यांनी ठरवलं. पण त्याचबरोबर छत्रपतींचा ज्यांनी अवमान केला ते कोरटकर आणि सोलापूरकर हे अजून मोकाट कसे? अबू आझमींना एक न्याय आणि या दोघांना वेगळा न्याय असं कसं चालेल?” असा सवाल काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केला.

“सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या संस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं. मी कोल्हापूर एसपींशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर सापडत नाही.. हा कुठला प्रकार आहे?” असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांची आगपाखड

दरम्यान, विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आक्रमक भूमिका मांडली. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, त्याला सोडलं जाणार नाही, असं फडणवीसांनी सांगितलं. “महाराजांचा अवमान करणाऱ्यांना आम्ही १०० टक्के जेलमध्ये टाकू. या कोरटकरनं कोल्हापूरच्या कोर्टातून अटकेवर स्थगिती घेतली आहे. त्यावर मी वरच्या कोर्टात जायला सांगितलं आहे. पण हे कोरटकर तर चिल्लर लोक आहेत. मला सांगा, जितेंद्र आव्हाड काय बोलले? त्याचा कधी निषेध केला नाही तुम्ही. जितेंद्र आव्हाड म्हणतात औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराज होते? औरंगजेब बलाढ्य होता, महाराज पाच फुटांचे होते हे रेकॉर्डवर आहे. त्याचा निषेध का केला जात नाही?” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना केला आहे.

पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचाही उल्लेख केला. “पंडित जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं, त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का? आहे का हिंमत? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे पंडित नेहरूंचाही धिक्कार झाला पाहिजे. छत्रपतींच्या विरुद्ध सगळ्यात जास्त पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत म्हणाले.

Story img Loader