Devendra Fadnavis : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला वारसा दिला, आजचा कार्यक्रम तो वारसा पुढे नेणारा कार्यक्रम आहे. भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु झाली. अनेक लोक त्या काळात लोक त्यांचा दुस्वास करायचे. विरोध करायचे, शेणाचे गोळे, दगड धोंडे फेकत असत. मात्र सावित्रीबाई फुले मागे हटल्या नाहीत. क्रांती सूर्य महात्मा फुले त्यांच्या मागे उभे होते. शाळा सुरु झाली त्यामुळे मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. हा शिक्षणाचा, समाज सुधारणेचा वारसा आपल्याला मिळाला आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच विरोधकांना त्यांनी टोला लगावला.

भिडे वाडा कसा मिळवला? हे छगन भुजबळ यांनी इतिहास सांगितला. अतिशय कमी कालावधीत सुंदर प्रकारचं स्मारक पुढची १०० काय ५०० वर्षे प्रेरणा देत राहिल, हे सुरु होतं आहे म्हणून मनापासून अभिनंदन. पुणे ही समाजसुधारकांची भूमी आहे. आज वारशाचा कार्यक्रम आहे तसाच विकासाचाही आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आधी एक पिलर तरी उभारुन दाखवा मग छात्या बडवा

पुणे मेट्रोबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. “पुणे मेट्रोचं उद्घाटन पुढे गेलं, म्हणून काही लोक छाती बडवत होते. ज्यांनी एक पिलर उभारला नाही ते छाती बडवण्यात पुढे होते. काहीतरी करुन दाखवा किमान एखादा पिलर तरी उभारा मग छात्या बडवा.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. तसंच ते पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये युती सरकार आल्यावर पुणे मेट्रोला गती मिळाली. पुणे मेट्रोची कामं वेगात पूर्ण झाली. पुणे मेट्रोचा टप्पा हा देशात वेगाने पूर्ण होणारा पहिला टप्पा आहे.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधकांना काहीही कामं राहिली नाहीत

विरोधकांना काही कामे राहिली नाहीत, त्यामुळे ते काही बोलत सुटले आहेत. पुण्यातील ही मेट्रो अंडरग्राउंड व्हावी, असे अनिल शिरोळे यांना वाटत होते. मात्र खर्च जास्त होत होता. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार नाही, हे लक्षात घेऊन आणि पुढील ५० वर्षांचा विकास लक्षात घेऊन हा प्रकल्प उभा राहिला आहे, असंही फडणवीस म्हणाले.

स्वारगेट स्टेशन अर्धवट झालेलं नाही

स्वारगेट स्टेशन अर्धवट झाल्याचा आरोप होत आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, स्वारगेट स्टेशन हे मल्टीमॉडेल स्टेशन आहे. या ठिकाणी सर्व प्रकारची वाहतूक एकत्र येणार आहे. देशात हे पहिले असे मल्टीमॉडेल स्टेशन असणार आहे. यामुळे लोक मेट्रोने प्रवास करण्यासाठी नाही तर हे स्टेशन पाहण्यासाठी येतील, असा आराखडा या मेट्रो प्रकल्पाचा केला आहे. पुण्यातील विस्तारीत मेट्रो वाघोली, चांदणी चौक आणि इतर भागात होत आहे. यामुळे भविष्यात पुण्यातील कोणत्याही टोकापासून कोणत्याही टोकापर्यंत मेट्रोने प्रवास करता येईल. पुणे शहर मेट्रोने इन्ट्रीग्रेट होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.