“मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यात मोठी आंदोलने चालली आहेत. मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षाला सर्वाधिक विरोध कुणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला होता. अगदी महाविकास आघाडीचे सरकार असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का? असे म्हणत हा प्रश्न उडवून लावला होता. त्यांना (विरोधी पक्ष) वारंवार संधी मिळूनही त्यांनी आरक्षण देऊ केले नाही”, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांचा ‘महाविजय २०२४’ मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करत असताना विरोधकांवर टीकास्र सोडले.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले, “शरद पवार आणि विरोधकांच्या मनात असते तर मंडल आयोग लागू झाला, तेव्हाच मराठा समाजाला आरक्षण दिले असते. त्यांच्या मनात असते तर सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे येण्याआधीही आरक्षण देता येऊ शकले असते. पण त्यांना कधी आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजा-समाजाला फक्त झुंजवत ठेवायचे होते. लोकं झुंजत राहिले, तर आपले नेतेपद कायम राहिल, ही त्यांची मानसिकता आहे.”
हे वाचा >> ‘राहुल गांधी ईश्वराने भाजपाला दिलेले वरदान’; देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, काँग्रेसचे मानले आभार
आम्ही टिकणारे आरक्षण दिले होते
“आमचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले. केवळ आरक्षण दिले नाही, तर ते उच्च न्यायालयात टिकवून दाखविले. सर्वोच्च न्यायलायात आपले सरकार असेपर्यंत ते टिकले. पण सरकार गेल्यानंतर त्यावर स्थगिती आली”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उबाठा सेना कोणत्या तोंडाने आरक्षणावर बोलते
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही टीका केली. ते म्हणाले, “मला तर आश्चर्य वाटते, उद्धव ठाकरे आरक्षणावर बोलतात. मंडल आयोगाच्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात तेव्हाच्या शिवसेनेने भूमिका घेतली होती. याच मुद्द्यावरून तर भुजबळ शिवसेनेच्या बाहेर पडले होते आणि आता कुठल्या तोंडाने तुम्ही आरक्षाणाची मागणी करता.”
हे ही वाचा >> बीड जाळपोळ प्रकरणी देवेंद्र फडणवीस-जयंत पाटील यांच्यात खडाजंगी!, “तुम्ही या सगळ्याला…”, फडणवीसांचं उत्तर
आमची कमिटमेंट ओबीसींशी
“मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न आपण करणार आहोत. पण त्याचवेळी ओबीसी समाजावर कुठल्याप्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. भाजपाची कमिटमेंट ओबीसी समाजाशी आहे. काहीही झाले तरी ओबीसी समजाचे आरक्षण टिकवणारच. आपण भाजपाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे प्रत्येक समाजाला न्याय देणे आपले काम आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जातीचे गट निर्माण होणे चांगले नाही. भाजपाच्या ओबीसी आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहिले पाहिजे. विभाजनाचे लोण पसरू देऊ नये”, असेही आवाहन फडणवीस यांनी केले.
“आपल्यासाठी कुठलाही समाज केवळ मतपेटी नाही. तसेच आरक्षणाचा मुद्दा हा निवडणुकाचा मुद्दाच होऊ शकत नाही. निवडणुकीचे मुद्दे वेगळे आहेत. आरक्षण हा केवळ सामाजिक प्रश्न आहे. पण या प्रश्नामुळे गावगाड्यावर कोणताही परिणाम होता कामा नये. महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकी भंग होईल, असे कोणतेही कृत्य आपल्याकडून व्हायला नको”, असेही ते म्हणाले.
माध्यमांचा प्रभाव असता तर भाजपा सत्तेत आलीच नसती
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, “विरोधकांना कितीही नरेटीव्ह तयार करू द्यात, त्याची चर्चा फक्त माध्यमांमध्ये होईल. माध्यमांचा परिणाम झाला असता तर भाजपा पक्ष कधीही सत्तेत निवडून आला नसता. माध्यमांचा महत्त्वाचा भाग आहेच. पण एखादा नरेटीव्ह सत्यापासून दूर असतो, अशाप्रकारचा नरेटीव्ह आपले भाग्य कधीही ठरवू शकत नाही. असा नरेटीव्ह चार दिवस चालून पाचव्या दिवशी गायब होतो. मराठा आरक्षणावरून आपल्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वॉर रुमची स्थापना झाली. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण एवढे वर्ष त्यांनीच आरक्षण दिले नाही, हे सत्य लोकांना कळले.”
आणखी वाचा >> “ठाकरे गटातील नेत्याची बॉम्बस्फोटातील आरोपीबरोबर पार्टी”, भाजपाकडून फोटो जाहीर, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
विरोधक देश-राज्याचा विचार करत नाहीत
देशाची हानी होईल, समाजात विघटन होईल, असे भाजपाचे कधीही वर्तन राहिले नाही. पण दुर्दैवाने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चुकीच्या मानसिकतेत गेला आहे. त्यांना फक्त सत्तेची चिंता लागली आहे. म्हणून त्यांच्याकडून देशाचा, राज्याचा विचार होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला अधिक सावध आणि सजग राहण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आपण पाहतोय, विरोधी पक्ष रोज भूमिका बदलत आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष ज्या प्रकारच्या भूमिका घेत आहेत, ते पाहता यांना राज्याची, समाजाची चिंता आहे, असे दिसत नाही. यांना केवळ सत्तेच्या राजकारणात आपले अस्तित्व कसे टिकवता येईल एवढाच विचार त्यांच्याकडून होताना दिसत आहे, अशीही टीका फडणवीस यांनी केली.