राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणुकांचे निकाल लागले असून त्यामध्ये काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत, तर काही ठिकाणी विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहे. मात्र, एकंदरीत भाजपाची स्पेस या निवडणुकीत वाढल्याची प्रतिक्रिया राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. संध्याकाळी या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.
“भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला”
या निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. “या निवडणुकीत भाजपानं निर्णय घेतला होता की आमचं स्थानिक नेतृत्व ती निवडणूक लढेल. आम्ही कुणीही प्रचाराला गेलो नाही. तरी जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं आहे. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते ३ पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
जिल्हा | भाजपा | शिवसेना | काँग्रेस | राष्ट्रवादी | इतर |
धुळे (१५ जागा) | ८ | २ | २ | ३ | ० |
नंदूरबार (११ जागा) | ४ | ३ | ३ | १ | ० |
अकोला (१४ जागा) | १ | १ | १ | २ | ९ |
वाशिम (१४ जागा) | २ | १ | २ | ५ | ४ |
नागपूर (१६ जागा) | ३ | ० | ९ | २ | २ |
पालघर (१५ जागा) | ५ | ५ | ० | ४ | १ |
नागपूरमध्ये भाजपाला फटका, पण फडणवीस म्हणतात…
या नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपाच्या ४ जागांवरून तीन जागा झाल्या. त्याचवेळी काँग्रेसला मात्र ९ जागा जिंकता आल्या. त्यावर बोलताना देखील फडणवीसांनी भाजपाला मतदारांनी कौल दिल्याचा दावा केला आहे. “नागपूरमध्ये आमच्या ४ जागा होत्या, त्या ३ झाल्या. पण जिल्हा परिषदेत जागा कमी झाल्या असल्या, तरी पंचायत समित्यांमध्ये आमच्या ४ जागा जास्त आल्या आहेत. त्यामुळे एकूणच या निवडणुकीकडे बघितलं तर पुन्हा एकदा भाजपाची स्पेस वाढतेय आणि या तीन पक्षांची स्पेस कमी होतेय, हे लक्षात येईल. त्यातही शिवसेना अधिक खाली जातेय, हे त्यातून स्पष्ट होतंय”, असं ते म्हणाले.
शिवसेनेच्या जिवावर काँग्रेस-राष्ट्रवादी…
“भाजपाची स्पेस वाढतेय. आम्ही उरलेली स्पेस व्याप्त करणार आहोत. आम्ही ती स्पेस वाढवत जाणार आहोत. पण शिवसेनेच्या जिवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेचीच स्पेस खात जाणार आहेत. त्यामुळे कोण रसातळाला जातंय हे या निवडणुकीत स्पष्ट होत आहे. पण याचा विचार त्यांनी करायचा आहे”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.