राज्यात करोनाच्या रुग्णांची आकडेवारी अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. दुसरीकड म्युकरमायकोसिसचे रुग्ण देखील हळूहळू वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाची रुग्णसंख्या आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरचे उपचार या मुद्द्यांवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यातील करोना रुग्णांच्या आकडेवारीसंदर्भात आपण केलेल्या दाव्यांना राज्य सरकार उत्तर देत नसल्याचं देखील ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस विदर्भातील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी करोना आणि म्युकरमायकोसिससंदर्भात राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
“आकडेवारी लपवली जातेय”
करोनाची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. “मी पुराव्यांसहीत कशाप्रकारे करोनाची आकडेवारी लपवली जात आहे हे सांगितलं आहे. माझे पुरावे खरे असून मी सरकारचीच आकडेवारी वापरली आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणी उत्तर देत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
‘म्युकरमायकोसिस’ उपचारांचा खर्च प्रचंड आहे.
राज्य सरकारची मोफत उपचारांची घोषणा फसवी आहे. राज्य सरकारने किमान या उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन मोफत दिले पाहिजे. सरकारी किंवा खाजगी रूग्णालय असा भेद करू नये.
खाजगी रूग्णालयातील उपचारांचे दर सुद्धा निश्चित व्हावे. माध्यमांशी संवाद… pic.twitter.com/KdIB9SJ4vh— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 26, 2021
“सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी”
दरम्यान, यावेळी फडणवीसांनी म्युकरमायकोसिस रुग्णांना मोफत उपचार मिळण्याची राज्य सरकारने केलेली घोषणा फसवी असल्याचा दावा केला. “म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी लोकांना खूप खर्च येतो आहे. त्याचे इंजेक्शन खूप महाग आहेत. सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आली की महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत म्युकरमायकोसिसचे उपचार मोफत होतील. सरकारची घोषणा पूर्णपणे फसवी आहे. मोठ्या प्रमाणावर लोकं खासगी रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. मोफत उपचार फक्त सरकारी आणि काही नोटिफाईड रुग्णालयांमध्ये होत आहेत. बहुतांशी रुग्णालयांमध्ये तो होत नाही”, असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.
Coronavirus : राज्यात दिवसभरात २४ हजार ७५२ नवीन करोनाबाधित, ४५३ रूग्णांचा मृत्यू!
“इंजेक्शनचा पूर्ण खर्च सरकारने करावा”
“म्युकरमायकोसिसचे रुग्ण कोणत्याही रुग्णालयात दाखल असले, तरी त्यांना इंजेक्शन मोफत द्यायला हवं. सरकारने इंजेक्शन खरेदी करावेत आणि जिथे रुग्ण असतील, तिथला इंजेक्शनचा सगळा खर्च सरकारने दिला पाहिजे. त्यासोबतच खासगी रुग्णालयातल्या इतर उपचारांचे दर सरकारने ठरवले पाहिजेत. लोकं घरं विकत आहेत. १०-१५ लाख खर्च करत आहेत. पण तरी मृत्यू होत आहेत. त्यामुळे खोटी आश्वासनं देणं योग्य नसून तात्काळ कारवाई करायला हवी”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.