महाराष्ट्रात नवं सरकार आल्यानंतर ऑगस्ट २०२२ पासून आम्ही पदभरती सुरु केली होती. राज्य सरकारने ७५ हजार नवीन पदं भरण्याची घोषणा केली होती. आज सभागृहात ही माहिती मी दिली की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आम्ही भरती सुरु केली. त्याच्या परीक्षा पारदर्शी पद्धतीने घेतल्या. अमरावतीची घटना सोडली किंवा तलाठी परीक्षेत पेपर चुकला होता तो प्रकार सोडला तर पारदर्शीपणे ही प्रक्रिया पूर्ण झाली. ऑगस्ट २०२२ ते आत्तापर्यंत ५७ हजार ४५२ तरुणांना आम्ही नियुक्ती पत्र दिलं आहे. तसंच याशिवाय महिन्याभरात ज्यांना नियुक्ती पत्र देण्यात येईल त्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अडीच वर्षात रेकॉर्ड ब्रेक नोकऱ्या आम्ही दिल्या

७७ हजार ३०५ लोकांना सरकारमध्ये नोकरी देण्याचं काम आम्ही केलं आहे. या शिवाय आत्ता जे अंतिम स्टेजला आहे अशी काही पदं आहेत ती ३१ हजार आहेत. एकूण हिशोब केला तर १ लाख ८ हजार नोकऱ्या सरकारमध्ये अडीच वर्षांच्या कालावधीत महायुती सरकारने दिल्या आहेत. हा देखील रेकॉर्ड आहे. पारदर्शी पद्धतीने हे सगळं करतो आहोत. ज्या घटना घडल्या त्या होऊ नये म्हणून आमच्या सरकारने निर्णय घेतला आहे की स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात नवा कायदा राज्य सरकार तयार करतं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचे निर्देश दिले आहेत. याच अधिवेशनात आम्ही कायदा मांडणार आहोत. जेणेकरुन पुढच्या प्रक्रियाही पारदर्शीपणे होतील. वर्ग क ची पदंही एमपीएससीच्या माध्यमातून भरली गेली पाहिजेत त्याचाही निर्णय आम्ही घेतला आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातल्या तरुणाईला दोन वर्षांच्या कार्यकाळात एक लाख नोकऱ्या देण्याचा नवा विक्रम हा आम्ही करुन दाखवला आहे. असंही फडणवीस म्हणाले.

हे पण वाचा- ‘तुम्ही विधानसभेची स्वप्नं पाहू नका, कारण महायुतीत…’, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

पेपरफुटीला प्रतिबंध करणारा कायदा आणणार

या अधिवेशनात पेपरफुटीला प्रतिबंध घालणारा कायदा मान्य केला जाईल. आमची चर्चाही सुरु झाली आहे. आजपासून देशात नवीन कायदे लागू झाले आहेत. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं मनापासून अभिनंदन करतो. ब्रिटिशांनी केलेले कायदे इतके वर्षे आपण वापरत होतो. जनतेच्या सेवेसाठी ब्रिटिशांनी कायदे केले नव्हते तर भारतीयांवर राज्य करता यावं म्हणून कायदे करण्यात आले होते. भारताच्या संसदेने नवे कायदे आणले आणि ते लागू झाले आहेत याचंही मी स्वागत करतो. ते कायदे नीट वापरता येण्यात वेळ लागेल. गंमतीचा भाग म्हणून सांगतो ४२० हा उल्लेख आपण करायचो. त्याचाही क्रमांक आता बदलला आहे. अशा पद्धतीने बरेच बदल आहेत. मात्र पोर्टल आपण तयार केले आहेत. पोर्टल चेंज करुन त्यात नवीन कायदे फीड करण्यात आले आहेत. १०० वर्षांपासून चाललेली व्यवस्था बदलत आहोत त्यात काही कालावधी जाईल. ज्या अडचणी येतील त्यांना तोंड देण्याची तयारीही आम्ही केली आहे असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा विरोधकांना टोला

ज्यांनी नव्या कायद्यांचा अभ्यासच केला नाही असे लोक काहीही बोलतील. अशा कायद्यांवर अभ्यास करुन बोलायचं असतं. सकाळ झाली की खोटं बोल, दुपार झालं की खोटं बोल, संध्याकाळ झालं की खोटं बोल, जेवायच्या आधी खोटं बोल, पचलं नाही तर पुन्हा खोटं बोल अशा प्रकारचे खोटे लोक आहेत त्यांनी वाचावं आणि चर्चा करावी. असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

मंत्री अनिल पाटील भाजपात येतील अशी चर्चाही नाही आणि असा काही विचारही नाही असं म्हणत अनिल पाटील यांच्या भाजपा प्रवेशावर भाष्य केलं आहे. सामनात काय येतं? ते कोण आहेत? कुणी काहीही बोलेल आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं? आमचाही काहीतरी स्तर ठेवा की. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.