राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन काल (दि. २० डिसेंबर) संपले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर टीका केली. मात्र सत्ताधाऱ्यांनी यावेळी अधिवेशनात झालेले कामकाज सांगत असतानाच विरोधक कसे कमी पडले, याचाही पाढा वाचला. शेवटच्या दिवशी विदर्भाचा प्रस्ताव विरोधकांनी आणला नाही. यावरून सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांना धारेवर धरले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत असताना शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांच्या अधिवेशनात दोन दिवसांची हजेरी लावली होती, त्यावरून फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढणारे वक्तव्य केले.
हे वाचा >> कुणबी दाखला घेणार का? अजित पवारांनी एका शब्दात दिलं उत्तर, म्हणाले…
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अधिवेशनाचा एकही मिनिट वाया गेला नाही, मंत्री अनुपस्थित आहेत म्हणून दोन्ही सभागृहाचं कामकाज थांबलं, असं एकदाही झालं नाही. दुसरं म्हणजे, या अधिवेशनाचं वैशिष्टं असं की, मा. उद्धव ठाकरे यांचे तब्बल दोन दिवस आम्हाला दर्शन घडलं. हेही या अधिवेशनाचं फलितच मानलं पाहीजे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “नागपूर अधिवेशनामध्ये विरोधकांनी विदर्भाचा एकही प्रस्ताव आणला नाही, असं हे पहिलंच अधिवेशन आहे. खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विदर्भाचाच असतो. अंतिम आठवडा प्रस्ताव नसेल तर २९३ चा प्रस्ताव दाखल केला जातो. सत्तारूढ पक्षाने विदर्भाचा प्रस्ताव आणला. पण विरोधी पक्षाने विदर्भाच्या विकासासंदर्भात कुठलाही प्रस्ताव आणला नाही. ही खेदजनक बाब आहे. अर्थात सत्तारूढ पक्षाने विदर्भाचा प्रस्ताव आणून त्याला समर्पक असे उत्तर दिले आहे.”
हे ही वाचा >> “…तर मोदींनी बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेलांचंही निलंबन केलं असतं”, ठाकरे गटाचं टीकास्र!
३३ वर्षात असं कधीही घडलं नव्हतं – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, मी ३३ वर्षांपासून विधीमंडळ सभागृहात आहे. पण एकदाही असे झाले नाही की, अधिवेशनाचा एकही मिनिट वाया गेला नाही. अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याबाबत विरोधकांनी मागणी केली तर कालावधी वाढविण्याची तयारी आम्ही केली होती. मात्र विरोधकांनी कालच अंतिम आठवडा प्रस्ताव आणला. अंतिम आठवडा प्रस्ताव आणला की, दुसऱ्या दिवशी अधिवेशन संपते. त्यामुळे विरोधकांची अधिवेशन अधिक काळ चालविण्याची मानसिकता नव्हती.
आणखी वाचा >> “हे धंदे आता बंद करा…”, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात रंगला कलगीतुरा…
या अधिवेशनात ७ ते २० डिसेंबरपर्यंत १०१ तास काम झाले. म्हणजेच रोजच्या तासांची सरासरी काढली तर आम्ही जवळपास पाच आठवड्यांचे काम या दिवसांत केलेले आहे. रात्री १२ वाजेपर्यंत काही वेळा विविध प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. विरोधकांनी आणि सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.