शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत घेतलेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात राज्यातील राजकीय परिस्थितीवर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतलं. देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल, अशा आशयाची टीकाही त्यांनी फडणवीसांवर केली. यासंदर्भात राज्याच्या राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
“माझा त्यांना सवाल आहे की…”
उद्धव ठाकरेंचं मुंबईतील गटनेता मेळाव्यातील भाषण म्हणजे अरण्यरुदन होतं, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. “कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरुदन होतं. माझा त्यांना सवाल आहे की आम्ही तर कायदेशीररीत्या निवडून आलो आहोत. मात्र, जेव्हा आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठित तुम्ही खंजीर खुपसला, तेव्हा तुम्ही राजीनामे का नाही दिले? तेव्हा का नाही निवडणुका घेतल्या?” असं फडणवीस म्हणाले.
“तेव्हा हिंमत होती तर…”
“तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हतात. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमच्यासोबत निवडून आला होतात. हिंमत होती, तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं होतं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जायचं होतं. त्यामुळे मला वाटतं की कालचं त्यांचं भाषण निराशेचं भाषण होतं”, असंही फडणवीस म्हणाले.
“मी त्यांना एवढंच सांगतो की..”
दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक प्रसिद्ध शेर एकवत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. “ते भाषणात असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक ठरेल. मी त्यांना एवढंच सांगतो, की मुद्दई लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है. तुम्ही तिघांनी मिळून २०१९लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून एकत्रपणे अडीच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकला नाहीत. यापुढेही संपवू शकला नाहीत”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
मेळाव्याची रंगीत तालीम: महिनाभरात निवडणुका घ्या! – उद्धव ठाकरे यांचे भाजपला थेट आव्हान
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या गटनेता मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोडाफोडीचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ही आपली पहिली निवडणूक आहे असं मानून सगळ्यांनी संपूर्ण ताकदीनं लढा. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक असेल”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.