महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. कुणाला किती जागा मिळणार? भाजपा किती जागा लढवणार? सिंगल डिजिटवर दोन्ही पक्षांना समाधान मानावं लागेल का? असे सगळे प्रश्न उपस्थित होते आहेत. अशात रामदास कदम यांनी भाजपावर संताप व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले रामदास कदम?

“महाराष्ट्र भाजपा जे काही करत आहे ते अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, त्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. परंतु, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा केसाने गळा कापू नका. असं केल्यास भाजपाकडून लोकांमध्ये एक वेगळा संदेश जाईल, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. आपल्यातील संबंधांबाबत लोकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये याचं भान भाजपाच्या काही लोकांना असणं आवश्यक आहे.”

राज्यातील जागावाटपात तीन तिघाडा नाराजांचा बिघाडा

माझ्या मुलाच्या मतदारसंघात बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते त्रास देत आहेत. स्थानिक आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून त्यांच्याच मतदारसंघात विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटनं केली जात आहेत. स्थानिक आमदाराला त्रास देतायत, हे सगळं हेतूपुरस्पर चाललं आहे. असं असेल तर भविष्यात भाजपावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. याची भाजपाच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. या सगळ्यावर आता उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“रामदास कदम यांना मी बरीच वर्षे ओळखतो. अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची त्यांची सवय आहे. टोकाचं बोलण्याची त्यांची सवय आहे. रागानेही ते बोलतात. भाजपाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. आम्ही ११५ आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्याबरोबर आली याचं आम्हाला समाधान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमचं पूर्ण समर्थन आहे.”

“आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष यांना बरोबर घेऊनच आम्ही पुढे जात आहोत. आम्ही सगळ्यांचा योग्य सन्मान ठेवू. आता ठीक आहे अनेक लोक लक्ष वेधून घेण्यासाठी बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी त्या गांभीर्याने घेऊ नये. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांना उत्तर दिलं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis smart answer to ramdas kadam about his comment do not ditch us scj