त्र्यंबकेश्वर मंदिरात मे महिन्यात घडलेल्या एका घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकाराविषयी मुद्दा उपस्थित केला. तसेच, या मुद्द्यावर नेमण्यात आलेल्या एसआयटीकडून अहवाल कधी मिळणार? यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील तपासाच्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमका काय आहे मुद्दा?

१५ मे रोजी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात काही मुस्लीम धर्मीयांनी संदल मिरवणुकीदरम्यान प्रवेशाचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला. यासंदर्भातले काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. संदल मिरवणुकीदरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप देऊन नंतर ही मिरवणूक पुढे निघते, अशी प्रथा असल्याचा दावा नंतर करण्यात आला. यासंदर्भात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपही झाले. याबाबत नंतर मिरवणूक काढणाऱ्या व्यक्तींनी “कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता”, असं म्हणत दिलगिरीही व्यक्त केली.

अशी कोणती प्रथा आहे की नाही? किंवा कुणी मुद्दाम धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे का? यासंदर्भात मंदिर ट्रस्टच्या तक्रारीची दखल घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे.

“खरंच प्रथा आहे का?”

“ही पेशवे काळापासून चालत आलेली प्रथा आहे. अशी प्रथा होती का? तशी असेल, तर या बाबतीत परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न कुणी केला का? नेमकी चूक कुणाची होती? जाणीवपूर्वक यात जातीभेद, धर्मवाद निर्माण करण्यासाठी कुणी प्रयत्न केले होते का? एसआयटीकडून याबाबत काय अहवाल प्राप्त झालेला आहे?” असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला.

फडणवीस म्हणतात, “तिथे आता शांतता आहे”

दरम्यान, शशिकांत शिंदेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी सरकारची सविस्तर बाजू मांडली. “अशी परंपरा आहे का? हाच वादाचा भाग आहे. काही लोक म्हणतात ती आहे, काही म्हणतात अशी कोणतीही परंपरा नाही. २०२२मध्ये ही मिरवणूक ते दरवाजातून आत घेऊन गेले. तिथे सेल्फी काढत होते, शूटिंग करत होते. याचे व्हिडीओ फूटेजही उपलब्ध आहे. इथे प्रश्न हा आहे की मंदिराच्या ट्रस्टींनी तक्रार केली आणि सांगितलं की ‘अशी कोणतीही परंपरा नाही, हा आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे’. त्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली. दोन्ही बाजूची बैठक झाली. त्यात तिथे जाणाऱ्या लोकांनी क्षमा मागितली आहे. त्यामुळे आता तिथे शांतता आहे”, असं फडणवीस म्हणाले.

विश्लेषण: त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाचा वाद काय आहे? त्या दिवशी नेमके काय घडले?

“एसआयटीचा अहवाल अजून आलेला नाही. ज्यांच्याविरोओधात गुन्हा दाखल केलाय, त्यांना सीआरपीसी ४१ नुसार नोटीस देण्यात आलेली आहे. त्याची पुढची चौकशी चाललेली आहे”, असंही फडणवीस म्हणाले.

कपिल पाटील यांचा आक्षेप

दरम्यान, “घटनेनं जितकं धार्मिक स्वातंत्र्य दिलंय, तितकंच श्रद्धेचंही दिलंय. श्रद्धेच्या स्वातंत्र्यात जाणीवपूर्वक कुणी वाद निर्माण करत असेल आणि परंपरा नाही असं सांगत असेल तर संयुक्त परंपरांच्या आड येणं हाच घटनाद्रोह आहे”, असं म्हणत आमदार कपिल पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उत्तरावर आक्षेप घेतला.

कपिल पाटील यांच्या आक्षेपानंतर पुन्हा फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलं. “कुठल्याही श्रद्धा व परंपरा पाळण्यासाठी शासनाची मनाई नाही. शासन त्यात कुठेही मध्ये येणार नाही. हिंदू-मुस्लीमांनी एकमेकांना सांभाळून घेतलं तर त्यापेक्षा चांगलं काय असेल? पण जर कुठे परंपरेच्या नावाखाली खोडसाळपणा चालत असेल, तर आपल्याला दोन्ही बाजूच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कुणी म्हटलं की आम्हाला एखाद्या मशिदीसमोर जाऊन नाचायचं आहे, माझी ती श्रद्धा आहे, तर अशी श्रद्धा कामाची नाहीये. कारण त्यांचं म्हणणं आहे की नाचता येणार नाही. त्यातून धार्मिक तेढच निर्माण होणार”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

महिन्याभरात SIT चा अहवाल येणार

“त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टींना धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केले आहे. त्यात सरकारी अधिकारीही आहेत. त्यांनी एखादी तक्रार दिली, तर त्याची दखल घेणं हे सरकारचं काम आहे. प्रथा-परंपरेच्या नावाखाली गोंधळ नाही घालता येणार. सगळ्यांनी एकमेकांच्या धर्माप्रती श्रद्धा ठेवावी. तरच संविधानाने दिलेल्या अधिकारांचं व्यवस्थित पालन केलं असं होईल. या प्रकरणाची चौकशी चालू असून तिथे पूर्णपणे शांतता आहे. महिन्याभरात एसआयटीच्या चौकशीचा अहवाल मागवण्यात येईल”, अशी माहितीही फडणवीसांनी यावेळी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis speaks on tryambakeshwar temple sandal procession issue pmw
Show comments