Devendra Fadnavis on Thackeray Brothers: गेल्या दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबाबत ‘भरंवसा नाही’ असं एका मुलाखतीत म्हटलं असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी ‘सोनू तुला माझ्यावर भरंवसा नाय का’, अशी मिश्किल टिप्पणी केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत सूचक विधान केलं आहे.
भारतीय जनता पक्षाची शिवसेनेशी जवळपास २५ वर्षं युती होती. त्यात शेवटच्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी एकत्रपणे युतीचा महाराष्ट्रातील कारभार पाहिला. मात्र, युती तुटली आणि महाराष्ट्रात राजकारणाचा नवा अध्याय पाहायला मिळाला. २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनीही भारतीय जनता पक्षाविरोधात जोरदार प्रचार केला. त्यामुळे दोन्ही ठाकरेंविरोधात भारतीय जनता पक्षाला उभं राहावं लागलं. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आज केलेल्या विधानाचे अर्थ लावले जात आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यापैकी कोणते ठाकरे जास्त आवडते आहेत, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलं. “ठाकरे असे आहेत की त्यांना आपण लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं.. कुठे भानगडीत पडता?” असा मिश्किल प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी केला.
“उद्धव ठाकरेंशी कोणताही संबंध नाही”
दरम्यान, उद्धव ठाकरेंशी गेल्या पाच वर्षांत कोणताही संबंध राहिलेला नसल्याचं फडणवीस म्हणाले. “गेल्या पाच वर्षांत माझा उद्धव ठाकरेंशी संबंध राहिलेला नाही. राज ठाकरेंशीच संबंध राहिला आहे. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकलेत. ठीक आहे, मारामारी नाहीये. समोर आलो तर आम्ही चांगलं बोलतो, नमस्कार करतो. पण संबंध वगैरे काही राहिलेला नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
पालिका निवडणुका एकत्र लढवणार
यावेळी आगामी महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील, असं फडणवीस म्हणाले. “महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढेल. आम्ही तिघं एकत्र राहू. एखाद्या महापालिकेत कदाचित नाही होऊ शकणार. पण जिथे जिथे शक्य होईल त्या त्या ठिकाणी एकत्र लढण्याचाच आमचा निर्णय असेल. मुंबईत आम्ही एकत्रच लढणार हे निश्चित आहे”, असं फडणवीस म्हणाले.
पालिका निवडणुकीत राज ठाकरे युतीत येण्याबाबत अनिश्चितता!
“राज ठाकरेंच्या बाबतीत आजतरी आमचा काही निर्णय झालेला नाही. आणि त्यांचा निर्णय ते घेतात, दुसरं कुणी घेत नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय ते काय घेतात, तेव्हाची परिस्थिती काय असते, आमची परिस्थिती काय असते यावर सगळं अवलंबून असेल. हे खरंच आहे की आम्ही तिघंच सामावून घेता घेता खुर्ची कमी पडायला लागली आहे. त्यामुळे आमच्यात चौथा सामावून घेता येईल का? असाही प्रश्न आहे. या सगळ्या मुद्द्यांचा त्या त्या वेळी विचार करू”, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केलं.