Pahalgam Terror Attack Maharashtra Tourists: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २५ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तेथे अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि सूचनांनुसार, महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगरहून मुंबईत परत आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिगोचे हे विमान उद्या २४ एप्रिल रोजी ८३ पर्यटकांना मुंबईत परत आणणार आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर माहिती देण्यात आले आहे.

याचबरोबर, महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी उद्या आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी प्रवाशांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यासाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. दरम्यान, या विशेष विमानाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे. याबाबतची माहितीही मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेकजण अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया येत असून मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत. यासह राज्यातील इतर घडामोडीही पाहुयात.

दरम्यान, काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केलाआहे. ०२२-२२०२७९९० या क्रमांकावर पर्यटक किंवा त्यांचे नातेवाईक मदतीसाठी संपर्क साधू शकतात.

तसेच, तिथे अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्याकरता इंडिगोच्या अतिरिक्त विमानाची सोय करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटकांशी समन्वय साधण्यासाठी गिरीश महाजन श्रीनगर येथे रवाना झाले असून मुंबई-पुण्यामध्ये आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा, मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरसाठी रवाना

पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असून विमानाची सोय करण्यात येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मीरसाठी रवाना झाले असून त्यांनी खासगी विमानाने उड्डाण केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना परत आणण्याची जबाबदारी ते पार पाडणार आहेत.