Devendra Fadnavis Speech in Vidhansabha: महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. पण त्याचप्रमाणे हलक्या-फुलक्या वातावरणात एकमेकांना काढलेल्या कोपरखळ्या आणि खोचक विधानंही सभागृहाच्या कामकाजातून चर्चेत आल्याचं दिसून आलं. आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अशाच प्रकारे प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महायुतीतील मित्र उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही राजकीय चिमटे काढले!
काय घडलं सभागृहात?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणासाठी उभे राहिल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम राज्यातील जनता आणि महायुतीतील घटकपक्षांचे आभार मानले. तसेच, यावेळी त्यांनी महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या विजयाबाबतची आकडेवारी मांडून हा ऐतिहासिक विजय ठरल्याचंही नमूद केलं. “नवीन सरकार आल्यानंतर विधानसभेतलं हे माझं पहिलं भाषण आहे. म्हणून मी या विधानसभेतील सर्व सदस्यांचं आणि महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचे आभार मानतो. त्यांनी आमच्या महायुतीला घवघवीत यश दिलं. २३७ आमदार सत्तापक्षाच्या बाजूने निवडून आले”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अजित पवारांना कोपरखळी!
यानंतर सत्तापदांवरील सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. मात्र, अजित पवारांचा उल्लेख करताना देवेंद्र फडणवीसांनी केलेला उल्लेख ऐकताच सभागृहात सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाकांवर हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. “या महायुतीमध्ये आमचे सहकारी आणि तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री..” असं म्हणून देवेंद्र फडणवीस बाजूला बसलेल्या अजित पवारांकडे वळले आणि म्हणाले, “दादा काही लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा.. असे आमचे अजित पवार आणि आमच्यासोबतच्या घटकपक्षांनी एकत्रपणे दिलेल्या सहकाऱ्यामुळे हा मोठा विजय आम्हाला मिळाला”!
इथे पाहा अधिवेशनाचं आजच्या दिवसाचं कामकाज..
नाना पटोलेंना काढला चिमटा!
भाषणाला सुरुवात करताना देवेंद्र फडणवीसांनी विरोधी बाकांवरून भाषणं झालेल्या काही सदस्यांची नावं घेतली. त्यावेळी समोरून नाना पटोलेंनी ‘मी राहिलो’ अशा आशयाची मिश्किल टिप्पणी केली. त्यावर देवेंद्र फडणवीसांनीही चिमटा काढत “तुम्ही सगळ्यात शेवटी बोललात”, असं म्हणत नाना पटोलेंचा उल्लेख केला. पण तसं झालं नसल्याबाबत समोरून उत्तर आल्यानंतर “अच्छा.. ठीक आहे.. राहू द्या आता.. आता उत्तर सुरू झालं. तुम्ही पुरवण्यांवर बोला.. किंवा नाना तुम्ही माझ्या कानात सांगा, मी त्याचं उत्तर देतो”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणताच विरोधी बाकांवरील सदस्यांनीही त्यांना हसून दाद दिली.
नरेंद्र मोदींच्या घोषणेचा केला उल्लेख
यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी दिलेल्या घोषणेचा उल्लेख केला. “भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पक्षाला चांगलं नेतृत्व दिलं. हे सगळं होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक नारा दिला. एक है, तो सेफ है. समाज एकसंध राहिला, तर आपण पुढे जाऊ शकू हा नारा त्यांनी दिला. त्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं प्रतिसाद दिला. त्यातून हा मोठा विजय आम्हाला मिळाला”, असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.