Devendra Fadnavis on Mumbai Metro Projects: मुंबईतील वाहतूक कोंडीवरच्या उपायांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मेट्रो मार्गिकांकडे पाहिलं जातं. यात मेट्रोच्या काही मार्गिकांचं काम पूर्ण होऊन त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या असून काही मार्गिकांचं काम चालू आहे. काही मेट्रो मार्गिकांचं काम अद्याप प्राथमिक स्तरावरच असून त्यांची कामं पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमके मेट्रो मार्गिकांचे किती, कोणते प्रकल्प चालू असून ते नेमके कधी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना माहिती दिली.

“५ वर्षांत १० मेट्रो मार्गिकांना मान्यता”

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केलेल्या सविस्तर भाषणात मुंबईतील मेट्रो मार्गिकांच्या कामाची सद्यस्थिती काय आहे व या मार्गिका कधीपासून सुरू होतील? याविषयी भाष्य केलं. “२०१४ ते २०१९ या काळात आपण जवळपास १० मेट्रो लाईन्सला मान्यता दिली. त्यातल्या काही मेट्रो लाईन्स पूर्ण झाल्या आहेत, काही अंतिम टप्प्यात आहेत तर काही बांधकामाधीन आहेत”, असं ते म्हणाले.

१. मेट्रो टप्पा २ अ हा १९ जानेवारी २०२३ ला कार्यान्वित झाला. मेट्रो टप्पा २ ब हा डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होईल तर त्याचा दुसरा टप्पा ऑक्टोबर २०२६ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण होईल.

२. मेट्रो ५ चं काम रखडल्याचा मुद्दा मांडला गेला. या मेट्रोच्या दोन टप्प्यात ठाणे ते भिवंडी आणि दुसरा भिवंडी ते कल्याण आहे. ठाणे ते भिवंडी या टप्प्याचं जवळपास ८० टक्के काम आपण पूर्ण केलं आहे. भिवंडी ते कल्याण या टप्प्यातल्या ५ किलोमीटरच्या पट्ट्यात खूप मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन आहे. त्याचा विचार करता आपला मानस बदलला असून भूमिगत मार्गिका टाकण्याचं आपण ठरवलं आहे. जेणेकरून पुनर्वसन करावं लागणार नाही आणि भिवंडीकरांना मेट्रो मिळेल. त्यासंदर्भात टीसीएलला आपण नेमलं आहे. त्यांचा प्रकल्प अहवाल आला की त्यासंदर्भातलं काम वेगाने सुरू करू.

३. मेट्रो ३ चं ९५ टक्के काम पूर्ण झालं आहे. आता त्याची चाचणीही झाली आहे. हा देशातला सर्वात मोठा भूमिगत टप्पा आहे. साधारणपणे जून २०२५ पासून कफ परेडपासून सीप्झपर्यंत ही भूमिगत मेट्रो आपण सुरू करू.

४. वडाळा-ठाणे-कासारवडवली या मार्गिकेचं काम ७९ टक्के पूर्ण झालं आहे. त्यात कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होईल. कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर डिसेंबर २०२६ पर्यंत तर गांधीनगर ते भक्ती पार्क नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल.

५. कासारवडवली ते गायमुख या मार्गिकेचं ८८ टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत ही मार्गिका सुरू होईल. ठाणे-कल्याण-भिवंडीचं पहिल्या टप्प्याचं काम ९५ टक्के पूर्ण झालं आहे.

६. मेट्रो ६ अंतर्गत स्वामी समर्थ नगर-विक्रोळी-कांजूरमार्गचं ७८ टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबर २०२६ मध्ये सुरू होईल.

७. २०२३ मध्येच मेट्रो ७ सुरू केली आहे. मेट्रो ९ आणि मेट्रो ७ अ यातील दहीसर ते मीरा भाईंदर मार्गकेचं ९५ टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर २०२५ मध्ये ते काम पूर्ण होईल.

८. अंधेरी ते मुंबई विमानतळ मार्गिकेचं काम ५५ टक्के झालंय. डिसेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल. गायमुख ते शिवाजी चौक या मार्गिकेच्या अंतिम टप्प्यासाठीच्या कामाच्या परवानग्या अंतिम टप्प्यात आहेत. मेट्रो ११ कल्याण ते तळोजा याचं ६ टक्केच काम पूर्ण झालं आहे. त्याची कारणं आधीच नमूद केली आहेत.

९. २०२५, २०२६ आणि २०२७ या तीन वर्षांत जवळपास मेट्रोचे महत्त्वाचे प्रकल्प आपण पूर्ण करत आहोत. यातून एमएमआर भागात मेट्रोचं मोठं जाळं उभं राहिलेलं पाहायला मिळेल.

मुंबई खड्डेमुक्त कधी होणार?

दरम्यान, मुंबई खड्डेमुक्त करण्याबाबत एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणेचा उल्लेख करत त्याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. “खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलं. त्यात पहिल्या टप्प्यातली २७ टक्के कामं पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या १४२० रस्त्यांपैकी ७४६ रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत. कोणत्याही परिस्थितीत २०२७ पर्यंत ही कामं पूर्ण करायची आणि मुंबई खड्डेमुक्त करायचा आपला प्रयत्न आहे”, असं ते म्हणाले.

कोस्टल रोडची सद्यस्थिती काय?

यावेळी कोस्टल रोडबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. “कोस्टल रोडमध्ये बांद्रा वर्सोवाचं काम चालू आहे. वर्सोवा-मढचंही कंत्राट महापालिकेनं दिलं आहे. वर्सोव्यापासून भाईंदरपर्यंतचंही कंत्राट दिलं आहे. मढपासून विरारपर्यंत याचा प्रस्ताव आपण केंद्राच्या मार्फत जायकाला पाठवतोय. त्यामुळे वेस्टर्न साईड पूर्णपणे वाहतूक कोंडीविरहीत होईल”, असं ते म्हणाले.